Thu, Dec 12, 2019 08:16होमपेज › Solapur › दरोडेखोरांकडून दाम्पत्याला मारहाण

दरोडेखोरांकडून दाम्पत्याला मारहाण

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 11 2017 10:32PM

बुकमार्क करा

टेंभुर्णी : प्रतिनिधी

माढा तालुक्यातील चौभेपिंपरी येथे रविवारी रात्री 12 नंतर देवकर यांच्या शेतातील वस्तीवरील घरात प्रवेश करून अज्ञात सहा दरोडेखोरांनी धाडशी दरोडा टाकला. वृद्ध देवकर पती-पत्नीस दंडक्याने मारहाण करीत चाकू व कुर्‍हाडीचा धाक दाखवून रोख 70 हजारांसह सोन्या-चांदीचे दागिने, असा तीन लाखांचा ऐवज त्यांनी लंपास केला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी धाव घेऊन माहिती घेतली आहे, तसेच श्‍वानपाथक व फिंगर प्रिंटचे पथकही दाखल झाले आहे.
या दरोड्यात किसन देवकर व त्यांची पत्नी हे जखमी झाले असून, या घटनेची फिर्याद सुनील किसन देवकर (वय 37) यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दिली आहे.

रविवारी रात्री देवकर कुटुंबीय झोपलेले असताना रात्री 12.35 वा. सुमारास अंदाजे 25-30 वयाच्या  तरुणांनी तोंडाला बांधून घरात प्रवेश केला. घरात येताच दरोडेखोरांनी देवकर पती-पत्नीस लाकडी दंडक्याने मारहाण करून दहशत निर्माण केली तसेच चाकू व कुर्‍हाडीचा धाक दाखवून दमदाटी करीत गप्प बसविले. दरोडेखोरांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करीत कपाटात ठेवलेले रोख 70 हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 90 हजार 900 रुपयांचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले. 

यादरम्यान शेजारच्या खोलीत मुलगा कुटुंबासह झोपला होता. तो आई-वडिलांच्या ओरडण्याने जागा झाला. मात्र त्याच्या खोलीस दरोडेखोरांनी बाहेरून कडी लावल्याने त्यास मदतीसाठी बाहेर येता आले नाही. तरीही त्याने खोलीतून मोठ्याने आवाज दिल्याने शेजारील वस्तीवरील जागे झाले. यानंतर दरोडेखोर पसार झाले.