होमपेज › Solapur › पदोन्‍नतीसाठीशिक्षकांचे धरणे आंदोलन

पदोन्‍नतीसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन

Published On: Feb 18 2018 2:04AM | Last Updated: Feb 18 2018 2:04AMसोलापूर : प्रतिनिधी

शासनाच्या ऑनलाईन बदली पोर्टल भरण्याचे काम सुरू होण्यापूर्वी  जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना पदोन्नती मिळावी व मंजूर सेवकसंचानुसार शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले.

पदोन्नतीमध्ये अपंग शिक्षकांचा अनुशेष भरून काढावा, 20 टक्के विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देणे, फेब्रुवारीअखेर 12 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या पात्र शिक्षकांना चट्टोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, 24 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या पात्र शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ देण्यात यावा, शाळेतील शालेय पोषण आहार अंतर्गत भात शिजवून देण्यासाठीच्या इंधन, भाजीपाल्याचे थकीत अनुदान ऑफलाईनने देण्यात यावे, शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मुख्यालयी राहाण्याच्या दाखल्याबाबत सक्ती करू नये, जिल्हा परिषदने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठीचा ठराव सभागृहात मंजूर करून शासनाला पाठवावा व  मृत शिक्षकांच्या वारसांची अनुकंपा तत्त्वावर भरती करावी आदी मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या. 

शिक्षणाधिकारी राठोड यांनी शिक्षण सभापती शिवानंद पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. यावेळी संजयकुमार यांनी शिक्षकांचे सर्व प्रश्‍न सोडवण्याचे ठोस आश्‍वासन दिले. जिल्हाध्यक्ष शिवानंद भरले यांनी आपल्या भाषणात सर्व प्रश्‍न तात्काळ निकाली नाही निघाल्यास दुसरा टप्पा म्हणून प्राणांतिक उपोषण करणार असल्याचे सांगितले.

यावेळी सरचिटणीस संभाजी फुले, अक्‍कलकोट संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड, दक्षिणचे अध्यक्ष सूर्यकांत हत्तुरे- डोगे,  विठ्ठलराव काळे, तात्यासाहेब गोरे, दादाराजे देशमुख, रावसाहेब जाधवर व लिंबराज जाधव आदींची भाषणे झाली.