Sat, Jul 20, 2019 10:37होमपेज › Solapur › आदर्श पुरस्कारासाठी शिक्षकांची जिल्हा परिषदेत ‘लॉबिंग’ सुरू

आदर्श पुरस्कारासाठी शिक्षकांची जिल्हा परिषदेत ‘लॉबिंग’ सुरू

Published On: Aug 24 2018 10:57PM | Last Updated: Aug 24 2018 10:32PMसोलापूर : प्रतिनिधी

शिक्षकदिनानिमित्ताने जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविण्यासाठी काही शिक्षकांकडून जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व अधिकार्‍यांकडे चक्क वशिलेबाजी सुरू आहे. हा पुरस्कार मिळविण्यासाठी काही शिक्षक आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधींच्या शिफारसी जिल्हा परिषदेकडे सादर करीत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

जि. प. शिक्षण विभागाकडून दरवर्षी शिक्षकदिनानिमित्ताने प्रत्येक तालुक्यातील एका आदर्श जि.प. शाळेतील शिक्षकास पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. ज्या शिक्षकांनी ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेची गुणवत्ता वाढविली आहे, शाळेत नवे प्रयोग राबवून विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी वाढविली, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले, अशा शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून पुरस्कार देण्यात येतो. 

या पुरस्कारासाठी दरवर्षी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत पुरस्कारासाठी  शिक्षकांच्या नावाची यादी   जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येते. जि. प. अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या   समितीकडून पुरस्कारासाठी शिक्षकांची नावे निश्‍चित करण्यात येतात. मागील वर्षी जि.प. पदाधिकार्‍यांनी पुरस्कारासाठी शिक्षकांची नावे निवडण्याचा पूर्ण अधिकार शिक्षणाधिकारी यांना दिला होता. यंदाही जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनीही पुरस्कारासाठी नावे गुणवत्तेनुसार व कार्यानुसार निवडीचे अधिकार शिक्षण खात्यास दिले आहेत.  जिल्हा परिषदेचा पुरस्कार मानाचा असल्याने काही शिक्षक विशेष कार्य नसतानाही पुरस्कार मिळविण्यासाठी लॉबी निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी जि.प. पदाधिकार्‍यांवर राजकीय दबाव आणण्यात येत असल्याचेही दिसून येत आहे. पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्याची प्रक्रिया म्हणजे सध्या जिल्हा परिषदेची डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी यातून अंग काढून घेण्याची भूमिका घेतली आहे.