Sun, Aug 25, 2019 12:16होमपेज › Solapur › शिक्षणाधिकार्‍यांच्या हट्टामुळे 65 लाखांवर पाणी

शिक्षणाधिकार्‍यांच्या हट्टामुळे 65 लाखांवर पाणी

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:44PMसोलापूर : प्रतिनिधी

जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी अदा करण्यासाठी अधिकार नसतानाही हा अधिकार माझा असल्याचा हट्ट केल्याने शिक्षकांच्या हक्काचे 65 लाख रुपये पाण्यात गेल्याचे स्पष्ट होत आहे. 

‘शिक्षकांच्या हक्काचे 65 लाख रुपये पाण्यात’ या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर अनेक खासगी शाळांतील शिक्षकांनी दै. ‘पुढारी’कडे व्यथा मांडल्या. अधिकार नसतानाही शिक्षणाधिकारी या प्रकरणात विनाकारण अडवणूक करीत असल्याने हा घोळ झाला आहे. अतोनात नुकसान होत असल्याची भावना शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. दर बारा वर्षांनी शिक्षकांना आश्‍वासित प्रगती योजनेंतर्गंत वेतनवाढीचा लाभ मिळतो. शिक्षकांना पदोन्नती मिळत नसली तरी वेतनात दर बारा वर्षांनी होणारी वाढ ही एकमेव समाधानकारक बाब होती. आता ही पगारवाढही पदरात पडत नसल्याने शिक्षक हवालदिल झाल्याचे दिसून येतात. खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांना संबंधित संस्थांकडून नियुक्ती करण्यात येते. वेतनवाढीचा प्रस्ताव संबंधित संस्थांकडून जि.प. वेतन अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात येतो. यात शिक्षणाधिकारी यांचा संबंध येत नाही. तरीही शिक्षणाधिकार्‍यांनी माझी मान्यता घेतल्याशिवाय वरिष्ठ वेतन वाढीचा लाभ मिळू देणार नसल्याची भूमिका घेतल्याने वेळेत शिक्षकांना याचा लाभ मिळाला नाही. निधी मार्चअखेरपर्यंत खर्च न झाल्याने राज्य शासनाकडे पुन्हा निधी परत गेला आहे. खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांना सातत्याने अनेक अडचणींना समोरे जावे लागते. या शाळांतील शिक्षकांचा पगार म्हणजे सामाजिक तिजोरी असून कोणीही यावे अन् या शिक्षकांच्या पगारातील रक्कम घेऊन जावे अशीच गत शिक्षकांची झाल्याचे दिसते. वरिष्ठ वेतनवाढीचा लाभ मिळण्यासाठी शिक्षकांना पाठपुरावा करावा लागला होता. 

Tags :  solapur zilla parishad, teacher