Fri, Jul 19, 2019 05:04होमपेज › Solapur › तालुका कृषी अधिकारी यांच्यासह चौघांच्या पोलिस चौकशीचे न्यायालयाचे आदेश

तालुका कृषी अधिकारी यांच्यासह चौघांच्या पोलिस चौकशीचे न्यायालयाचे आदेश

Published On: Mar 07 2018 9:35AM | Last Updated: Mar 06 2018 9:15PMमाढा  :  वार्ताहर

उपळाई खुर्द येथे डाळिंबाची बाग नसताना ती असल्याचे भासवून शेतकरी संदीप पाटील याच्यासह तालुका कृषी अधिकारी व इतर तीन अधिकारी अशा चौघांनी संगनमताने शासकीय अनुदानाची रक्कम उचलून अपहार करून शासनाची फसवणूक केली, अशी फिर्याद माढा न्यायालयात दाखल केली होती. त्यावर या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश माढ्याच्या न्या. मनीषा थोरात यांनी पोलिसांना दिले.

याप्रकरणी माढा न्यायालयात नागनाथ उद्धव कदम यांनी शेतकरी संदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी शरद सोनवणे, सहायक कृषी अधिकारी एस. एम. काळेल, मंडल अधिकारी एच. ए. बोराडे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार सन 2013 साली उपळाई खुर्द येथील शेतकरी संदीप पाटील यांच्या शेतात डाळिंबाच्या बागेची लागवड नसताना बाग आहे असे भासवले.  यासाठी 45 हजार 439 रुपये इतके शासकीय अनुदान 19 मार्च 2015 रोजी मंजूर केले गेले.

त्यानंतर माढेश्‍वरी बँकेत संदीप पाटील यांच्या खात्यावर ते 20 मार्च 2015 ला जमा केले. त्यानंतर संदीप पाटील अटकेत असताना त्यांच्या  बँक खात्यावर असलेली रक्कम न्यायालयाची परवानगी नसताना काढली गेली. त्यानंतर ही गोष्ट फिर्यादीच्या निदर्शनास आली. यासंदर्भात फिर्यादी नागनाथ कदम यांनी जिल्हाधिकारी व पोलिसांकडे तक्रार केली. त्यावर काही कारवाई न केल्याने माढा न्यायालयाकडे यासंदर्भात दाद मागितली.

दरम्यान, मंडल कृषी अधिकारी कार्यालय यांनी 19 जून 2015 रोजी एका पत्राव्दारे संदीप पाटील यांच्याकडे त्यांचे क्षेत्रावरील फळबाग जळीतामुळे आपण घेतलेले शासकीय अनुदान सात दिवसांत जमा करावे, अशी मागणी केली. त्यानंतर त्यांच्यावतीने ही रक्कम बँक ऑफ इंडिया शाखा माढा येथे 6 जून 2015 रोजी जमा करण्यात आली. या प्रकरणात संशयित आरोपींनी डाळिंबाची बाग लागवड नसताना व ती जळालेली नसताना शासकीय अनुदान खात्यावर  जमा करून व ती रक्कम उचलून संगनमताने शासकीय रकमेचा अपहार केल्याची फिर्याद नागनाथ कदम यांनी दाखल केली होती. त्यानुसार माढा न्यायालयाने या प्रकरणी पोलिस  चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी माढा न्यायालयात फिर्यादीतर्फे अ‍ॅड. सागर कन्हेरे यांनी बाजू मांडली.