Sun, Aug 25, 2019 03:36होमपेज › Solapur › तहसीलदारांच्या गाडीला जेसीबीने धडक; पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा

तहसीलदारांच्या गाडीला जेसीबीने धडक; पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:49PM

बुकमार्क करा
माढा : वार्ताहर

तांदूळवाडी येथे सीना नदीपात्रात अवैधरीत्या वाळू  उत्खनन, साठा व विक्री केल्याप्रकरणी माढा पोलिसांत पाच आरोपींविरोधात दरोडा व शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद दाखल झाली असून, याप्रकरणी माढा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे, तर 23 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत माढा पोलिसांत तलाठी एस. यू. डिकोळे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दिगंबर दत्तात्रय गवळी, सत्यवान सौदागर जाधव, राजेंद्र सुभाष शिंदे (तिघेही रा. तांदूळवाडी), पांडुरंग झोडे (रा. इंदापूर), अमोल गुरव (रा. म्हैसगाव) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची हकिकत अशी की, सीना नदीपात्रात तांदूळवाडी येथे अवैधरीत्या वाळू उत्खनन व साठा असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या भरारी पथकास मिळाली.

 त्यानुसार त्यांनी मंगळवारी रात्री साडेअकरानंतर अचानक छापा टाकून कारवाई केली. यावेळी अमोल गुरव यांच्या ट्रॅक्टरच्या सहायाने जमीन गट नंबर 454 पैकी गायरानात सुमारे 47 ब्रास वाळूचा साठा किंमत 3,29,000 रुपये जेसीबी वीस लाख रुपये व मोटारसायकल वीस हजार रुपये असा एकूण तेवीस लाख एकोणपन्नास हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला. यावेळेस यातील आरोपी हे शासकीय वाळूवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे मिळून आले. यावेळी आरोपीस प्रतिबंध करत असताना त्यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करुन जेसीबी पळवून घेऊन जात असताना तहसील कार्यालय यांच्याकडील वहान क्रमांक एमएच 45 डी 0038  बोलेरो जीपला धडक देऊन 50 हजारांचे नुकसान केले. या कारवाईत एस.एस. कांबळे, पी.डी. नकाते, एस.व्ही. शेटे, एस. के. भोये, एस. एम. इंगोले, बी. एन. मुरकुटे यांनी सहभाग घेतला. याप्रकरणचा अधिक तपास सपोनि अतुल भोस हे करीत आहेत.