होमपेज › Solapur › सोलापूर : नवजात चौथ्या मुलीचा गळा घोटणार्‍या आईस जन्मठेप

सोलापूर : नवजात चौथ्या मुलीचा गळा घोटणार्‍या आईस जन्मठेप

Published On: Mar 09 2018 8:44PM | Last Updated: Mar 09 2018 8:13PMसोलापूर : प्रतिनिधी

चौथ्या वेळीही मुलगीच झाल्याने दोन तासाच्या नवजात मुलीचा गळा दाबून खून करणार्‍या आईला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी जन्मठेप आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मीनाक्षी दशरथ कोळी (वय २८, रा. कुमठा गाव, ता. उत्तर सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आईचे नाव आहे.  

मीनाक्षी कोळी हिला पूर्वीच्या अस्मिता, साक्षी आणि सुश्मिता अशा तीन मुली आहेत. चौथ्यांदा ती गरोदर राहिली होती. १५ डिसेंबर २०१४ रोजी तिच्या पोटात दुखत असल्याने तिचा दीर केदारनाथ याने तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी रात्री तिची प्रसूत झाली आणि चौथ्या वेळीही तिला मुलगीच झाली.  कोळी हिच्याकडे नवजात बालिका असताना तिने बाळासह स्वतः पांघरूण घेऊन हॉस्पिटलमधील कॉटवरच बाळाचा गळा आवळून स्वतःच्या मुलीचा खून केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी मीनाक्षी कोळी हिला अटक करुन सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले होते. यात मीनाक्षी दोषी आढळल्याने तिला जन्मठेपेची शिक्षा ठोठविण्यात आली.