Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › Solapur › सोलापूर : वानराने घेतला स्वामींच्या प्रसादाचा लाभ (व्‍हिडिओ)

सोलापूर : वानराने घेतला स्वामींच्या प्रसादाचा लाभ (व्‍हिडिओ)

Published On: Feb 20 2018 9:39AM | Last Updated: Feb 20 2018 9:39AMसोलापूर : प्रतिनिधी

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत कोट्यवधी भक्तांच्या मनात स्थान निर्माण करणार्‍या अक्कलकोट स्वामी समर्थांच्या अन्नछत्र कक्षात दोन दिवसांपूर्वी आनोखा साक्षात्कार स्वामी भक्तांना घडून आला. एका वानराने चक्क जेवणाच्या पंक्तीत बसून भक्त दाम्पत्यासह प्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार एका भक्ताने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला आहे. 

अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात जशी भक्तगणांच्या आख्यायिका सांगितल्या जातात त्याचप्रमाणे याठिकाणी वावरणाऱ्या पशुप्राण्यांच्याही आख्यायिका प्रसिद्ध आहेत. याठिकाणी असलेली वानरं कधी स्वामींच्या समाधीस्थळ तसेच कधी वटवृक्षाच्या छायेत बसून ध्यान करताना दिसून येतात तर कधी कुत्रा स्वामींच्या मूर्तीसमोर साष्टांग दंडवत घालतानाचे अनेक अनुभव याठिकाणी सांगितले जातात. आता या आख्यायिकेत आणखी एक भर पडली असून दोन दिवसांपूर्वी अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या एका जोडप्याच्याजवळ चक्क एक वानर येवून बसला. याठिकाणी उपस्थित भाविकांना काहीकाळ भीती वाटली, परंतु या वानराने कोणताही उपद्रव न करता या भाविकाच्या ताटातील महाप्रसाद खाण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे संबंधित भक्ताला याठिकाणच्या आख्यायिका माहिती असल्याने त्यांनी या वानराला कुठेही विरोध दर्शविला नाही. उलट संबंधित वानरासोबत एका ताटात या महाप्रसादाचा लाभ घेतला. जवळपास दहा ते बारा मिनिटे संबंधित वानर महाप्रसाद भक्षण करत होता. यानंतर हे वानर स्वतः त्याठिकाणाहून निघून गेला. स्वामींच्या अन्नछत्र मंडळात हा प्रकार घडत असताना तब्बल शेकडो भाविक याठिकाणी उभे होते हे विशेष. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सर्वत्र या घटनेचीच चर्चा रंगत आहे.