Fri, Jul 19, 2019 23:05होमपेज › Solapur › संतप्त शेतकर्‍यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तुळजापुरात रास्ता रोको

संतप्त शेतकर्‍यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तुळजापुरात रास्ता रोको

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 1:14AMतुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर शहर व परिसरातील गावातून जात असलेल्या नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 साठी संपादीत झालेल्या जमिनींचा मावेजा कवडीमोल दराने जाहीर करून परिसरातील शेतकर्‍यांची सरकार फसवणूक करत आहे, या बाधीत शेतकर्‍यांना सदर जमिनीचा मावेजा वाढवून देण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकासमोरील चौकात रास्ता रोको करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गासाठी अधिग्रहीत केलेल्या शेतजमिनींना कवडीमोल मावेजा देऊन गरीब शेतकर्‍यांना आयुष्यातून उठवण्याचा घाट शासनाने बांधला आहे.

शेतकर्‍यांच्या हक्काच्या, कष्टाच्या जमिनीला योग्य मोबदला दिल्याशिवाय पुढील काम होऊ दिले जाणार नाही, बळजबरीने शेतात वाहने घुसवल्यास हातात रुमणे घेऊन आम्हीही तयार आहोत, असा इशारा देत शासनाने शेतकर्‍यांच्या जिवाशी खेळू नये, अन्यथा आम्ही आमच्या न्याय्य हक्कासाठी जीव देऊ आणि प्रसंगी जीव घेऊही शकतो, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी ठणकावले. ते तुळजापुरात संघटनेच्या मागण्यांसदर्भात रास्ता रोको केल्यानंतर बोलत होते.

यावेळी शेतकरी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठी गर्दी होती. शहरातील मुख्य चौकात रस्ता रोखल्यामुळे चारही मार्गावर वाहने थांबून दूरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
प्रस्तावित नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीसाठी शहरानजीकच्या जमिनींसह काक्रंबा, तडवळा, हंगरगा (तुळ), सिंदफळ शिवारातील जमिनींचे भूसंपादन झाले आहे. या संपादीत शेतजमिनींचा मावेजा रु. 12 हजार ते रु. 22 हजार प्रतिगुंठा अशा अत्यल्प दराने देण्यात येत आहे. याच महामार्गासाठी इतर ठिकाणी रु.4 लाख ते रु. 6 लाख 62 हजारपर्यंत दिला गेला आहे. त्यामुळे काक्रंबा, मोर्डा, तडवळा, हंगरगा (तुळ), सिंदफळ शिवारातील शेतकर्‍यांना सहा लाख प्रतिगुंठा दराने मावेजा देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी केली आहे. 

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, धनाजी पेंदे, शहाजी जगदाळे, रोहीत चव्हाण, गुरु भोजने, शांताराम पेंदे, विष्णू गाटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी भागवत नेपते, श्याम गायकवाड, डॉ.धनके, संजय जाधव आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गोकुळ (तात्या) शिंदे, नगरसेवक सचिन रोचकरी यांनी या रास्ता रोकोला पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला.
याप्रसंगी मागणी संदर्भातील निवेदन नायब तहसीलदार भारती यांना देण्यात आले. रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.