होमपेज › Solapur › सुवर्ण सिद्धेश्‍वर ध्यानमंदिराच्या सभामंडपाचे काम युद्धपातळीवर

सुवर्ण सिद्धेश्‍वर ध्यानमंदिराच्या सभामंडपाचे काम युद्धपातळीवर

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 29 2017 10:22PM

बुकमार्क करा
सोलापूर : इरफान शेख

एकाच वेळेस पाच हजार भाविक दर्शन घेतील अशी व्यवस्था करत श्री सिद्धेश्‍वर मंदिराच्या सभामंडपाचे काम सुरू आहे. यंदाच्या मकर संक्रांतीला हे सभामंडप तयार होणार असल्याची माहिती सिद्धेश्‍वर मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांकडून देण्यात आली.

सोलापूरचे वैभव म्हणून दरवर्षी जानेवारी महिन्यात  सिद्धेश्‍वर गड्डा यात्रा भरविली जाते. यंदाच्या वर्षी सिद्धेश्‍वर मंदिरात भव्य असे सभामंडपाचे काम जोरात सुरू आहे. हे सभामंडप 90 फूट रुंद व 150 फूट लांब असे तयार केले जाणार आहे.  भूगर्भातील ध्यान मंदिर 40 फूट रुंद आणि 60 फूट लांब अशी रचना केली जाणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथून लाखो भाविक सिद्धेश्‍वर महायात्रेत दर्शनासाठी येतात. शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांच्या वास्तव्याने सोन्नलगीला म्हणजे आजच्या सोलापूरला भूकैलास अशी प्रतिष्ठा प्राप्त  झाली. श्री सिद्धरामेश्‍वरांनी सोलापुरात 68 शिवलिंगांची  स्थापना केली. तलावाला तीर्थांची प्रतिष्ठा लाभली. आपल्या शिष्यांच्या आणि जनसामान्यांच्या श्रमदानातून तलावाची निर्मिती केली. सुमारे नऊशेहून अधिक वर्षांची परंपरा आजही कायम असून सिध्दरामेश्‍वर मंदिर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान होऊन ते कायम राहिले आहे.

भाविकांसाठी ग्रामदैवत सिद्धेश्‍वर  मंदिरातील सभामंडपाचे बांधकाम युध्दपातळीवर सुरू आहे. सुमारे पाच हजार भाविक या सभामंडपात एकाचवेळी दर्शन घेतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. मकर संक्रांतीच्या वेळी सोलापूर शहरात सिध्देश्‍वर महायात्रा भरते. त्या यात्रेत नंदीध्वजांची मिरवणूक, अक्षता सोहळा व होमप्रदीपन असे मुख्य कार्यक्रम होतात. येणार्‍या लाखो भाविकांच्या सोयीसाठी हे सभामंडप उभारण्यात येत आहे. यात्रा कालावधीत सुवर्ण सिद्धेश्‍वरच्या कामाला गती मिळाल्याचे पाहून भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.