Tue, Sep 25, 2018 10:34होमपेज › Solapur › बार्शी येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू 

बार्शी येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बार्शी :  तालुका प्रतिनिधी 

तावरवाडी (ता. बार्शी) येथील  25 वर्षीय तरुणाचा मृतदेह बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर असलेल्या  एका पेट्रोल पंपाजवळील चिलारीच्या झाडात  आढळून आला असल्यामुळे बार्शी शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार घात की अपघात याबाबत चर्चेला उधाण  आले आहे.

आकाश  ऊर्फ  अक्षय नारायण बारंगुळे  (वय 25, रा. तावरवाडी ता. बार्शी) असे पाचव्या दिवशी सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश बारंगुळे हा 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता घरामधून निघून गेला होता. तावरवाडी येथे राहात  असलेला आकाश हा बार्शी शहरात दैनंदिन कामासाठी येत  असे. बुधवारी रात्री कुर्डुवाडी रोडवरील एका मंदिराजवळ वाढदिवस साजरा करून तो आपल्या दुचाकीवरून गावाकडे जात होता. शुक्रवारी मात्र अक्षय वापरत असलेली पल्सर दुचाकी कुर्डुवाडी रस्त्यावर अपघातग्रस्त अवस्थेत आढळून  आली होती. यापूर्वी बार्शी पोलिसांत हरवल्याबाबत नोंद करण्यात आली होती. 

रविवारी (दि.26) सकाळी कुर्डुवाडी रोडवरील चांडक पेट्रोल पंपाच्या उजव्या बाजूला असलेल्या चिलारीच्या झाडात आकाश बारंगुळे याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून  आला आहे. वैभव  अरुण बारंगुळे ( रा. तावरवाडी)  यांनी बार्शी पोलिसांत दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यात खुनाची मालिकाच सुरू असताना पुन्हा एका तरुणाचा मृतदेह पाचव्या दिवशी चिलारीच्या झाडात मिळून आल्यामुळे तर्कवितर्क लढवले जात  आहेत.