Wed, May 22, 2019 20:17होमपेज › Solapur › सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेसाठी शिवसेनेचे साकडे

सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेसाठी शिवसेनेचे साकडे

Published On: Dec 12 2017 7:52PM | Last Updated: Dec 12 2017 7:51PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

शिंदे साहेब, आपणच आगामी लोकसभेची निवडणूक लढवा, या शब्दांत शिवसेनेचे संपर्कप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना साकडे घातल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बरडे यांनी असे साकडे घालून ‘कुठे’ धनुष्यबाणाचा निशाणा साधला आहे याविषयी तर्कवितर्कांना ऊत आला आहे. 

बरडे यांनी मंगळवारी सोलापुरात शिंदे यांची त्यांच्या ‘जनवात्सल्य’ या निवासस्थानी आपल्या समर्थकांसह भेट घेतली. यावेळी शिंदे, काँग्रेसचे पदाधिकारी तसेच बरडे यांच्यात बंद खोलीत चर्चाही झाल्याची माहिती आहे. ‘साहेब शिवसेनेचे आणि मी साहेबांचा...’ या शब्दांनी बरडे यांनी शिंदे यांच्याशी चर्चेला सुरूवात केली. आगामी लोकसभा निवडणूक आपण लढविणार नाही, नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असे विधान माजी गृहमंत्री शिंदे यांनी नुकतेच केले होते. या पाठोपाठ भाजपचे विद्यमान खा. शरद बनसोडे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार हे शिंदेच राहतील, असा अंदाज वर्तविला होता. या पार्श्‍वभूमीवर बरडे यांनी शिंदे यांना आपणच लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी करुन राजकीय गोटात एकच खळबळ उडवून दिली आहे.

या भेटीबाबत बरडे यांच्याशी दै. ‘पुढारी’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, मी शिंदे साहेबांची चार-पाच महिन्यांतून एकदा भेट घेत असतो. त्यात गैर काहीच नाही. शिवसेनेचे लोक नारायण राणे यांना भेटतात, मग मी शिंदे साहेबांना भेटले तर काय चुकीचे, असा सवालही यावेळी बरडे यांनी केला. शिंदे हे राजकारणातील भीष्माचार्य आहेत. सर्व पक्षातील लोक त्यांना मानतात. राजकारणात ४० वर्षे अनुभवी असलेल्या शिंदे हे पुन्हा खासदार झाल्यास शहराचा विकास होईल, असे सर्वांचे मत आहे. मी त्यांना फक्त निवडणूक लढवा, अशी विनंती केली आहे. कोणत्या पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवावी, याविषयी मी त्यांच्याशी बोललो नाही, असा खुलासाही बरडे यांनी यावेळी केला.

या भेटीप्रसंगी माजी आ. प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे मनपातील गटनेते चेतन नरोटे, माऊली पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, बरडे यांनी शिंदे यांना लोकसभा निवडणूक लढविण्याविषयी साकडे घातल्याने राजकीय गोटात तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. जिल्हा शिवसेनाप्रमुखपदी महेश कोठे यांच्या नियुक्तीनंतर या पक्षात नवीन व जुने मंडळी यांच्यात मोठी धुसफूस आहे. कोठे यांच्याविषयी जुन्या अनेक नेत्यांची नाराजी असल्याचे बरडे यांच्या विधानातून स्पष्ट झाले आहे.