Tue, Jul 23, 2019 06:16होमपेज › Solapur › सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी सर्वेक्षणाला गती

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी सर्वेक्षणाला गती

Published On: Feb 24 2018 9:23PM | Last Updated: Feb 24 2018 8:45PMकरमाळा : प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील मौजे जातेगाव ते टेंभुर्णी यादरम्यानच्या 65 कि. मी. अंतराच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामासाठी गती मिळालेली आहे. हा रस्ता सहापदरी करण्यासाठी शासन स्तरावरून शासकीय कामाला वेग आलेला आहे. या रस्त्याच्या कामाकरिता सध्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.

अहमदनगर ते टेंभुर्णी यादरम्यानच्या 140 कि.मी. रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाल्यानंतर यादरम्यानच्या रस्त्यामध्ये करमाळा तालुक्यातील मौजे जातेगाव ते टेंभुर्णी यादरम्यानच्या 65 कि.मी. अंतराच्या रस्त्याच्या कामासाठी लागणार्‍या रस्त्यालगत जमिनीचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर हा रस्ता सहापदरी होणार आहे. या कामासाठी रस्त्यालगतच्या शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. 

मोजणीचे काम सुरु

रस्त्याच्या कामाला लगतची किती जमीन लागते आहे, यासाठी सध्या मोजणीचे काम सुरू आहे. मौजे जातेगावपासून जातेगाव, कामोणे, मांगी, करमाळा, देवळाली, झरे, पोफळज, जेऊर, शेलगाव, आदिनाथ कारखाना, कविटगाव, कंदर, अकोले खुर्द, टेंभुर्णी आदी गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनी रस्त्याच्या कामासाठी संपादित केल्या जाणार आहेत. संपादित करण्यात येणार्‍या जमिनींमध्ये सध्या शेतकर्‍यांची असलेली विविध पिके, फळबागा, विहिरी, बांधकामे, घरे आदी स्थावर मालमत्ता रस्त्याच्या कामात जाणार असल्यामुळे या रस्त्याच्या कामाची मोजणी होऊन शासनाकडून त्याचा मोबदला देण्यात येणार आहे. 

शेतकर्‍यांना नोटिसा

साधारणपणे करमाळा तालुक्यातील अडीच हजार शेतकर्‍यांना या कामासाठी शासनाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मोजणीसाठी शेतकर्‍यांनी सहकार्य करून उपस्थित राहण्याचेही सांगितले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना संपादित करण्यात आलेल्या जमिनी व स्थावर मालमत्ता यांचा मोबदला शासनाकडून देण्यात येणार आहे.

या कामासाठी गतीने पावले उचलली जात असल्यामुळे एकीकडे समाधान व्यक्त होत असले तरी हा रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. या रस्त्यावर शेकडो लोकांचे बळी पण अपघातामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्यानंतर या रस्त्याचे काम वेळेत होणे गरजेचे असून दुसरीकडे या रस्त्यावर येणारे पूल व बाह्यवळण काढणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाचा महत्त्वाचा नियम म्हणजे हा रस्ता हा वळण काढून केला जातो. त्यामुळे टेंभुर्णी ते जातेगाव यादरम्यान रस्त्यामध्ये येणारे वळण व पूल काढणे गरजेचे आहे. त्यामध्ये मांगी येथील पूल, जेऊर, कविटगाव याठिकाणचे पूल न ठेवता या रस्त्यावर महामार्ग म्हणून हा रस्ता होणे गरजेचे आहे. त्यामुळे मोजणी करताना हे काम शासन नियमानुसार सरळ मोजणे गरजेचे आहे. 

नुकसान भरपाई मिळणार

या मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकर्‍यांना रस्त्यामध्ये गेलेल्या जमिनींचा, स्थावर मालमत्ता व त्याचबरोबर उभी पिके, फळबागा अशा नुकसानीची भरपाईसुद्धा  शासनाकडून देण्यात येणार आहे. या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, या कामासाठी संपादित करण्यात येणार्‍या जमिनीला जास्तीत जास्त मोबदला देण्यात यावा, शेतकर्‍यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची दक्षता शासकीय अधिकारी व यंत्रणेने घ्यावी, अशी रास्त मागणी करमाळा तालुक्यातील रस्त्यालगत येणार्‍या शेतकर्‍यांकडून केली जात आहे.