Fri, Mar 22, 2019 01:30
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सुरतगावच्या वृद्धेचे दीड लाखांचे दागिने मिळाले परत

सुरतगावच्या वृद्धेचे दीड लाखांचे दागिने मिळाले परत

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:15PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सुरतगाव (ता. तुळजापूर) येथील एका 60 वर्षांच्या महिला प्रवाशाचे रिक्षात विसरलेले सुमारे दीड लाखांचे दागिने रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे परत केले. नवी वेस पोलिस चौकीच्या पोलिसांनी पिशवीत राहिलेल्या मोबाईलवरून त्या रिक्षा चालकाला शोधले आणि त्यानेही चौकी गाठत दागिने परत करून  त्या वृद्ध महिलेविषयी आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला.

सुरतगाव येथील 60 वर्षांच्या   अनुराधा विठ्ठल गुंड या शनिवारी  एसटीने  सोलापुरात  आल्या. शहरातील आमराई परिसरात राहणार्‍या आपल्या मुलीकडे जाण्यासाठी त्यांनी एसटी स्टॅन्डपासून रिक्षा (एमएच 13 जी 7278)  पकडली. रिक्षात चढताना आजीबाईंनी आपल्याजवळील दोन पिशव्या रिक्षात ठेवल्या. भैय्या चौकात  दुपारी त्या उतरल्या. मात्र लाल रंगाची एक पिशवी त्या रिक्षामध्येच राहिली. रिक्षा निघून गेल्यानंतर त्यांना एक पिशवी रिक्षात राहिल्याचे समजताच त्यांनी तातडीने नवी वेस पोलिस चौकी गाठली. तेथे ड्यूटीवर असलेल्या पोलिस शिपाई अविनाश शिंदे यांना  अनुराधा गुंड यांनी घडलेला प्रकार   सांगितला व रिक्षातील पिशवीमध्ये त्यांचा मोबाईल असल्याचे सांगितले. अनुराधा यांनी त्यांचे जावई विठ्ठल शिंदे यांचा मोबाईल नंबर सांगितला. शिंदे यांना पोलिसांनी हकीकत सांगितली. आणि शिंदे यांनी त्या आजीबाईंना आपल्या दुचाकीवर बसवून रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टॅन्ड गाठले व रिक्षाचालकाची शोधाशोध केली. परंंतु, तो मिळून आला नाही. 

दरम्यान, चौकीतील पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवरून रिक्षात विसरलेल्या पिशवीतील  मोबाईलवर संपर्क केला आणि गोरख ज्ञानदेव  जगदाळे या रिक्षा चालकाने मोबाईल उचलला. त्यावेळी पोलिसांनी त्याला रिक्षासह नवी वेस चौकीस येण्यास सांगितले. तत्पूर्वी रिक्षा चालक आणि त्याच्या पत्नीने आजीबाईंना शोधण्यासाठी बसस्थानक आणि रेल्वे स्थानक गाठले व शोधाशोध केली. मात्र आजीबाई दिसून आल्या नाहीत. त्यामुळे तो  नवी वेस चौकीला आला. तिथे अनुराधा गुंड यांनी रिक्षा आणि चालकालाही ओळखले. त्यावेळी चालकासोबत त्याची पत्नीसुद्धा सोबत आली होती. 

पोलिस चौकीत गोरख जगदाळे या चालकाने रिक्षात विसरलेली आजीबाईंची पिशवी पोलिसांना काढून दिली. त्यावेळी  आजीचे डोळे पाणावले होते. त्या पिशवीत 3 तोळे सोन्याच्या पाटल्या, दीड तोळे सोन्याचा लक्ष्मीहार, अर्धा तोळे सोन्याचा शेवंती हार आणि रोख 10 हजार रुपये असा सुमारे 1 लाख 50 हजारांचा ऐवज होता.

पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक जी. बी. पांढरे यांच्यासमोर सर्व सोने आणि रोख रक्कम अनुराधा गुंड यांना सुपूर्द करण्यात आली. प्रामाणिक पणाबद्दल आजीबाईंनी रिक्षाचालक गोरख जगदाळे यांना दोन हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. पोलिसांनीही त्या प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार करत त्याचे आभार मानले. चौकीतील कर्मचारी शिंदे, बनसोडे, कुलकर्णी या पोलिस कॉन्स्टेबल यांनी तातडीने पावले उचलल्याने आणि रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखविल्यामुळे आपले लाख मोलाचे सोने आपल्याला परत मिळाल्याची प्रतिक्रिया अनुराधा गुंड यांनी व्यक्त केली. 

सहायक पोलिस निरीक्षक पांढरे यांनीसुद्धा आपल्या कर्मचार्‍यांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत आजही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे पांढरे यांनी सांगितले. या घटनेमुळे सोलापूर शहराबद्दल सकारात्मकता निर्माण झाल्याचे दिसले.