Sat, Jul 20, 2019 03:07होमपेज › Solapur › शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित करू नका : जि.प सदस्या शैला गोडसे

शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित करू नका : जि.प सदस्या शैला गोडसे

Published On: Mar 11 2018 11:24PM | Last Updated: Mar 11 2018 10:35PMपंढरपूर : प्रतिनिधी 

सध्या उन्हाळी हंगाम सुरू झाला असून पीकांना पाण्याची गरज असताना थकीत वीज बिले, भारनियमनाच्या नावाखाली नदीकाठच्या गावांमध्ये वीज मंडळाकडून भारनियमनबरोबरच वीज बिल वसुलीपोटी सरसकट वीज कनेक्शन तोडणी मोहीम सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यातच परीक्षेचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे भारनियमन व शेतीचा वीज पुरवठा खंडित करणे वीज वितरणने थांबवावे अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा कुरूल जि.प. गटाच्या सदस्या शैला गोडसे यांनी दिला आहे.

उन्हाची तीव्रता वाढत असताना शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा व पाण्याची गरज आहे. मात्र वीज वितरणने संपूर्ण जिल्हाभर थकीत वीज बिलाच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित करण्याचे धोरण सुरू केले आहे. हे धोरण सुरू असताना एखाद्या रोहित्रावर असणार्‍या वीज जोडण्यापैकी अर्ध्या लोकांनी पैसे भरूनही काही लोकांची थकीत बिले असल्याकारणाने त्या ठिकाणच्या रोहित्रांचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे वीज बिले भरणार्‍या शेतकर्‍यांचेही नुकसान होत आहे. याचा वीज वितरणने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात हातातोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांच्या या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवालही शैला गोडसे यांनी उपस्थित केला आहे.

सध्या 10 वी 12 वीसह शालांत परीक्षांचा कालावधी अंतीम टप्प्यात आहे. ग्रामीण भागातील सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असताना भगिरथ योजनेलाही वीज वितरणकडून सुरू असलेल्या भारनियमनाचा फटका बसत असून विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीवर याचा परिणाम होत आहे. शेतकरी, विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता वीज वितरणकडून सुरू असलेली वीज तोडणीची मोहीम थांबवावी व भारनियमन कमी करावे, अशी मागणी शैला गोडसे यांनी केली आहे.