Sun, Jan 20, 2019 12:20होमपेज › Solapur › जनावरांच्या दवाखान्यातील शिपायाने केली आत्महत्या

जनावरांच्या दवाखान्यातील शिपायाने केली आत्महत्या

Published On: Mar 10 2018 10:37PM | Last Updated: Mar 10 2018 10:26PMसोलापूर : प्रतिनिधी

देगाव येथील जनावरांच्या दवाखान्यामधील शिपायाने नैराश्येतून  दवाखान्याच्या स्टोअर रूममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.  या घटनेची  सलगर वस्ती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नागनाथ दत्तू शिंदे (वय 48, रा. तेलगाव, ता. उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. नागनाथ शिंदे हे देगाव येथील जनावरांच्या दवाखान्यामध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. राज्य सरकारी कर्मचार्‍यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याचे लांबणीवर पडले आहे. तसेच शिंदे यांनी शेतीवर सोसायटी व बँकेकडून कर्ज काढले होते. हे कर्ज शासनाच्या कर्जमाफीमध्ये माफ झालेले नव्हते. त्यामुळे शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून तणावातच होते.

7  वा वेतन आयोग लागू   करण्याचे लांबणीवर पडल्यामुळे आणि शेतीचे कर्ज माफ न झाल्याच्या नैराश्येतून शिंदे  यांनी देगाव येथील दवाखान्याच्या स्टोअर रुममध्ये छताच्या अँगलला सुती दोरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शिंदे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून या चिठ्ठीमध्ये आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. 

सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक एन. बी. शिंदे यांनी शिंदे यांना खाली उतरवून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉ. श्‍वेता वाली यांनी शिंदे यांना मृत घोषित केले. याबाबत सलगर वस्ती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक वाघ तपास करीत आहेत.