Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Solapur › हुमणीचा प्रादुर्भाव; साखर उद्योग संकटात

हुमणीचा प्रादुर्भाव; साखर उद्योग संकटात

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 9:01PMश्रीपूर : सुखदेव साठे

सध्या सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश ऊस पिकाला हुमणी किडीने घेरले असून उसाचे फड उद्ध्वस्त होऊ लागल्याचा फटका शेतकर्‍यांबरोबरच कारखान्यांना बसत असल्याने साखर उद्योग संकटात आला आहे. यंदा पुरेसा पाऊस नसल्याने हैराण असलेल्या शेतकर्‍यांवर निसर्गानेही अवकृपा केली आहे.

गतवर्षी 30 ते 40 टक्के ऊस लागवड झाली आहे.  त्यामुळे यंदा सर्रास कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 60 ते 70 टक्के खोडवा गाळपास उपलब्ध आहे. यंदा तुटून जाणार्‍या खोडवा पिकासच हुमणी किडीचा जास्त प्रादुर्भाव झाला आहे. उभे असलेले पीक जागेवरच जळून जाऊन त्याचे पाचट बनु लागले आहे. त्यामुळे उच्चांकी गाळपाची वल्गना करणार्‍या कारखानदारांचे यंदा  अंदाज चुकणार आहेत, हे मात्र निश्‍चित मानले जात आहे. 

सोलापूर जिल्ह्यात नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळला गेला  व  त्याचप्रमाणात  सहकारी व  खासगी साखर कारखान्याची संख्या वाढत गेली.  नैसर्गिक असमतोलपणामुळे कधी अतिरिक्त उसाचे उत्पादन तर कधी उसाचा तुटवडा. त्यामुळे साखर कारखानदारी संपूर्णतः  निसर्गावर अवलंबून व बेभरवशाची झाली आहे. अशातच अधूनमधून ऊस पिकावर येणारे रोगराई यामुळे शेतकरी व कारखानदार हवालदिल झाले आहेत. सलग दोन वर्ष चांगला पाऊस झाल्याने उजनी धरण भरले व मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली. गत वर्ष चांगले गेले. 

परंतु यावर्षी हुमणी किडीचा नदी काठच्या व पठारावरील उसास मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे गाळपाआधीच ऊस जळून गेल्याने यंदा कारखान्याला किती ऊस उपलब्ध होईल हे अंदाज बांधता येणे अवघड झाले आहे. यंदा साखर आयुक्ताने सोलापूर, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यासाठी ऑक्टोबर महिन्यातच गाळपाची परवानगी दिली आहे.   म्हणून सर्वच कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. कारखाने सुरु होण्यास अजून महिना ते दीड महिना अवधी आहे. सद्यस्थितीला सर्वच कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस 15 ते 20 टक्के हुमणी किडीने बाधित झाले असून  त्यामध्ये  झपाट्याने वाढच  होत आहे. शेतकर्‍यांनी अनेक प्रकारची औषधे वापरली, परंतु कीड काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे कारखाने सुरु होईपर्यंत गाळपासाठी किती ऊस उपलब्ध होईल. याबाबत कारखान्यासमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागांचा आर्थिक कणा म्हणून साखर उद्योगाकडे पाहिले जाते. त्यातच हे किडीचे नवीन संकट उभे ठाकल्यामुळे कारखाने किती दिवस चालतील, हे येणारा काळच  ठरवेल.