Wed, Nov 14, 2018 14:18होमपेज › Solapur › रिकव्हरी कमी दाखवून शेतकर्‍यांची होणारी लूट थांबवा : संजय पाटील

रिकव्हरी कमी दाखवून शेतकर्‍यांची होणारी लूट थांबवा : संजय पाटील

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

टेंभुर्णी : प्रतिनिधी

उसाची रिकव्हरी कमी दाखवून शेतकर्‍यांची होत असलेली लूट थांबवावी. तसेच 2 हजार 750 रुपये पहिली उचल जाहीर करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील-भीमानगरकर यांनी केली.

भीमानगर येथे शनिवारी दुपारी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उसाला पहिली उचल 2 हजार 750 रुपये देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना, बळीराजा शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय पाटील-भीमानगरकर बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, तालुक्यातील कुठल्याही साखर कारखान्यांनी उसाला पहिला हप्ता 2 हजार 750 रूपये जाहीर करावा. त्या कारखान्याच्या चेअरमनची हत्तीवरून मिरवणूक काढू, यात कुठलेही राजकारण आणणार नाही. आपल्या मुलाप्रमाणे जपलेल्या शेतकर्‍यांच्या उसाला रास्त भाव मिळाला पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्ह्याची रिकव्हरी फक्त एक टक्के कमी लागते. इतर जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकर्‍यांचा उसाला योग्य भाव देत असताना या तालुक्यातील शेतकर्‍यांच्या उसाला भाव का  दिला जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर म्हणाले की, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा कारखाना ज्या पध्दतीने बंद पाडला त्या पध्दतीने शिंदे बंधूंचा कारखाना बंद पाडायला मी सगळ्यात पुढे असेन. शिंदे बंधूंनी जिल्ह्यातील इतर कारखान्यांवर दबाव टाकून शेतकर्‍यांचा कष्टाला ते दर देत नसल्याची टीका त्यांनी आ. बबनराव शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्यावर केली. शेतकर्‍यांना जोपर्यंत योग्य दर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख मधुकर देशमुख, दत्ता पाटील, अमोल धुमाळ, नागनाथ वाघे, शांतीलाल कुटे, प्रताप पिसाळ, काकासाहेब टेळे, रमेश पाटील, विठ्ठल चव्हाण, प्रशांत सोनवणे, राजू पाटील, लालासाो कसबे, देवीदास पोळ, मगन महाडिक,  विलास जाधव, राजू तोडकर, अमोल जगदाळे, विक्रम पाटील, भारत मस्के आदी कोंढार भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.