Tue, Jul 23, 2019 16:43होमपेज › Solapur › ऊस दरासाठी रोखला महामार्ग

ऊस दरासाठी रोखला महामार्ग

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:33PM

बुकमार्क करा

माढा : वार्ताहर

  
जनहित शेतकरी संघटनेचे नेते भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोडनिंब येथे ऊस दरप्रश्‍नी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माढा तालुक्यातील साखर कारखानदारांविरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या. 

सोलापूर जिल्ह्यातील ऊस दरप्रश्‍नी विविध शेतकरी संघटनांच्या वतीने नुकतेच आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्याने एफआरपी अधिक चारशे रुपये दर देण्याचे जाहीर केले होते; परंतु जिल्ह्यातील अन्य कारखानदारांनी अद्यापही पहिली उचल जाहीर केली नाही. त्यामुळे जनहित शेतकरी संघटनेचे नेते भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोडनिंब येथे आज, मंगळवारी ऊस दरप्रश्‍नी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांनी महामार्ग रोखून धरला होता. यावेळी आंदोलकांनी तातडीने माढ्यातील साखर कारखानदार यांनी ठरल्याप्रमाणे उचल जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी बोलताना भैय्या देशमुख यांनी सर्व शेतकरी संघटनांनी सहकारमंत्री यांच्या शब्दाला मान देऊन एफआरपी अधिक चारशे रुपयांच्या पहिल्या उचलीवर आंदोलन स्थगित केले; परंतु काही कारखानदार अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यांवर पहिली उचल जमा करण्यास तयार नाहीत. म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत. यापुढील काळात आमचे आंदोलन उग्र असणार आहे. कारखानदार यांनी शेतकर्‍यांचा संयम पाहू नये, येणार्‍या काही दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यांवर रक्‍कम जमा न झाल्यास कारखाने बंद पाडण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.