Fri, Jul 03, 2020 04:00होमपेज › Solapur › सोलापूर : गव्हाणीत उड्या मारून गाळप रोखणार

सोलापूर : गव्हाणीत उड्या मारून गाळप रोखणार

Published On: Dec 02 2017 10:30PM | Last Updated: Dec 02 2017 10:30PM

बुकमार्क करा

मोहोळ : प्रतिनिधी

माझी आंदोलनाची लढाई केवळ शेतकर्‍यांच्या उसाला योग्य भाव मिळावा, यासाठी आहे. लोकनेते कारखान्याने एफआरपी अधिक चारशेचा भाव येत्या आठवड्यात जाहीर न केल्यास कारखान्यावर गनिमी काव्याने जाऊन गव्हाणीत उड्या मारून कारखाना बंद पाडण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरभैया देशमुख यांनी दिला.

लोकनेते कारखान्याचा दिशेने पाटकूलहून अनगरकडे निघालेला जनहित शेतकरी संघटनेचा मोर्चा मोहोळ पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पंढरपूर रोडवर पाटकूल फाटा येथे रोखला. यावेळी मोर्चासाठी अनगरच्या दिशेने जाणार्‍या आंदोलकांनी प्रभाकरभैया देशमुख यांच्यासमवेत रस्त्यावरच ठिय्या मांडून रास्ता रोकोस प्रारंभ केला. जनहित शेतकरी संघटनेने तब्बल तासभर रास्ता रोको करत लोकनेते कारखान्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

देशमुख म्हणाले की, आम्ही ऊसदरासाठी लोकनेते व भीमाविरोधात आंदोलनाचा रितसर इशारा दिला होता. त्यानुसार कारखान्याला आठवड्याची मुदतही आम्ही आंदोलन करून दिली. मग लोकनेते कारखान्याने दर घोषित करणे अपेक्षित असताना तो केला नाही. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चासाठी जात होतो. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला पाटकूल फाट्यावरच रोखले. दुर्दैवाची बाब म्हणजे आमच्या लोकशाही मार्गाच्या आंदोलनाविरोधात महिलांचा प्रतिमोर्चा काढण्याची केलेली तयारी निश्‍चितपणे खेदजनक आहे. यावेळी देशासाठी लढणार्‍या शहिदाचे पार्थिव घेऊन जाणार्‍या लष्करी सेवेतील वाहनाला रस्ता खुला करून देण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुंगत येथील नेते विजय रणदिवे यांनीही भाषणातून लोकनेते व भीमा कारखान्याच्या दराबाबत विलंब धोरणाचा खरपूस समाचार घेतला. नायब तहसीलदार किशोरसिंह बडवे यांनी निवेदन स्वीकारले. मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.