Tue, Apr 23, 2019 00:44होमपेज › Solapur › हंगाम अंतिम टप्प्यात, तरी ऊस दराबाबत कारखानदार गप्प

हंगाम अंतिम टप्प्यात, तरी ऊस दराबाबत कारखानदार गप्प

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 08 2018 1:16AM

बुकमार्क करा
सोलापूर : महेश पांढरे 

जिल्ह्यातील यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी साखर कारखानदारांनी ऊसदराबाबत अद्याप आपले तोंड उघडले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अंतिम दर किती मिळणार याविषयी साशंकता निर्माण झाली आहे, तर यामधून शेतकरी संघटना मात्र गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आजपर्यंत सहकारी साखर कारखान्यांनी 31 लाख 71 हजार 665 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे, तर त्या माध्यमातून 32 लाख 16 हजार 335 साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे, तर खासगी 19 साखर कारखान्यांनी आजपर्यंत 39 लाख 64 हजार 714 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे, तर त्यामधून 38 लाख 73 हजार 100 साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. त्यामुळे यंदा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी साखर कारखानदार ऊस दरावर बोलण्यास तयार नाहीत, तर अनेक साखर कारखान्यांनी ऊस बिलाचा पहिला हप्ताही शेतकर्‍यांच्या नावावर जमा केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या हवालदिल झाले आहेत, तर शेतकर्‍यांचे तारणहार म्हणून सुरुवातीला कांगावा करणार्‍या जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना मात्र सध्या गायब झाल्याचे दिसून येत आहे. 

साखरेचे दर उतरले आहेत, तर बँकांना तारण कर्ज द्यायला तयार नाहीत. त्यामुळे उसाची पहिली रक्‍कम जमा करण्यास आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे संघटनांनी मागणी केलेली रक्‍कम जमा करणे दुरापास्त असल्याची छुपी चर्चा कारखानदारांनी सुरू केली आहे. तर या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीतही साखर कारखानदारांनी आपल्या अडचणी सांगितल्या असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे उसाचा अंतिम दर काय असणार, हे आताच सांगता येणार नसल्याचे अनेक साखर कारखानदारांनी बोलून दाखविले आहे.