Tue, Apr 23, 2019 21:34होमपेज › Solapur › जिल्ह्यात नव्याने ६० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड

जिल्ह्यात नव्याने ६० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 9:40PM

बुकमार्क करा

सोलापूर  : संतोष आसबे 

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण तुडुंब भरल्याने जिल्ह्यात  विक्रमी ऊस लागवड होत असून 25 नोव्हेंबरअखेर  जिल्ह्यात 59 हजार 782  हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. सर्वाधिक आडसाली उसाची लागवड पंढरपूर व माळशिरस तालुक्यात झाली आहे.

यंदा सलग दुसर्‍या वर्षी उजनी धरण तुडुंब भरले आहे. जिल्ह्यात काही मोजके तालुके वगळता चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा ऊस पिकाकडे वळला असून जिल्ह्याची वाटचाल ही विक्रमी ऊस लागवडीकडे होताना दिसत आहे. 

 सोलापूर जिल्ह्यात उसाचे सरासरी क्षेत्र 1 लाख 61 हजार 776 हेक्टर असून यंदा गाळपासाठी जिल्ह्यात 1 लाख 5 हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे.  जिल्ह्यात नव्याने 25 नोव्हेंबरअखेर 59 हजार 782 हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. यामध्ये 24 हजार 892 हेक्टरवर आडसाली उसाची लागवड, तर 24 हजार 761 हेक्टरवर सुरू हंगाम ऊस लागवड झाली आहे. 

अद्यापही ऊस लागवड सुरू असून जानेवारीअखेरपर्यंत शेतकरी ऊस लागवड करीत असतात. त्यामुळे आणखी 30 ते 40 हजार हेक्टरवर ऊस लागवड होण्याची शक्यता आहे. यंदा जवळजवळ एक लाख हेक्टरवर नव्याने ऊस लागवड होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सार्वाधिक उसाची लागवड पंढरपूर तालुक्यात झाली असून या तालुक्यात 16 हजार 701 हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे, तर माळशिरस तालुक्यामध्ये 10 हजार 396 हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे.

 सध्या गाळप हंगाम सुरू असून  गाळप हंगामासाठी जिल्ह्यात 1 लाख 7 हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे. यापैकी 90 टक्क्यांवरील ऊस क्षेत्राची लागवड गेल्यावर्षी झाल्याने हा ऊस पुढील वर्षी खोडवा म्हणून ऊस गाळपासाठी साखर कारखान्याला उपलब्ध होणार आहे. नव्याने आजअखेर 60 हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली          असून आणखीन ऊस लागवड शेतकरी करीत आहेत. त्यामुळे किमान एक लाख हेक्टरवर उसाची लागवड होणार असून पुढील वर्षी गाळपासाठी जिल्ह्यात दोन लाख  हेक्टरपेक्षा अधिक ऊस उपलब्ध होणार आहे. 

 सरासरी उसाचे क्षेत्र गृहीत धरल्यास पुढील वर्षी 125 टक्के ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी जिल्ह्यातील  साखर कारखान्यांना मुबलक ऊस उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नसून  पुढच्या वर्षीच्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात  अतिरिक्त उसाचे उत्पादन होणार आहे.