Mon, Jul 06, 2020 12:03होमपेज › Solapur › घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपात आत्मदहनाचा प्रयत्न 

घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपात आत्मदहनाचा प्रयत्न 

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 11:40PM

बुकमार्क करा
सोलापूर :  प्रतिनिधी

महापालिकेच्या घंटागाड्यांवर काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना किमान वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी महापालिका आयुक्‍त कार्यालयासमोर करण्यात आलेले आंदोलन चिघळले. यावेळी दोन कर्मचार्‍यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, तो पोलिसांनी उधळून लावत कामगार नेते श्रीशैल गायकवाड यांच्यासह अनेकांना लाठीचा प्रसाद दिला. याप्रकरणी गायकवाड यांच्यासह 10 जणांना अटक करण्यात आली असून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घंटागाडी कर्मचार्‍यांना किमान वेतन लागू करण्याची मागणी गत महिन्यापासून जोर धरली आहे.  मनपा आयुक्‍तांनी या मागणीला तत्त्वत: मान्यता देऊन स्थायी समितीच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र  स्थायी समितीच्या मंजुरीआधीच याची अंमलबजावणी व्हावी, अशी श्रीशैल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील कामगार संघटनेची मागणी होती. या मागणीसाठी घंटागाडी कर्मचारी शनिवारपासून अचानक काम बंद केले होते. सोमवारी पर्यायी यंत्रणा उभारून मनपाने कचरा संकलनाचे काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचारी संघटनेने याला आडकाठी आणल्याने काम ठप्प झाले. यावर मनपा प्रशासनाने  पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. 

या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कामगार नेतेे श्रीशैल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली घंटागाडी कर्मचारी तसेच कार्यकर्ते असा एकूण 50 जणांचा जमाव मनपा आयुक्‍त कार्यालयाजवळ आला. यावेळी त्यांच्या हातात लाकडी दांडकेही होती. त्यावेळी आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे हे अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, उपायुक्‍त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्यासमवेत चर्चा करीत होते.  कर्मचारी दांडके घेऊन आल्याचे समजताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. एवढ्यात आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांनी आयुक्‍त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याच गोंधळात पोलिसांसमक्ष दोन कर्मचार्‍यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत हा प्रयत्न उधळून लावला. गोंधळ थांबत नसल्याचे दिसून येताच पोलिसांनी लाठीमाराला सुरुवात केली. यामुळे कर्मचारी व कार्यकर्त्यांची पांगापांग झाली. गायकवाड यांच्यासह अनेकांना यावेळी लाठीचा मार खावा लागला. पोलिसांनी गायकवाड यांच्यासह 10 जणांना अटक केली.

याप्रकरणी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांकडून  सायंकाळी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.