Sat, Mar 23, 2019 02:07होमपेज › Solapur › सोलापुरात खोदकामावेळी आढळले दगडी भुयार

सोलापुरात खोदकामावेळी आढळले दगडी भुयार

Published On: Aug 22 2018 12:10AM | Last Updated: Aug 22 2018 12:01AMसोलापूर ः प्रतिनिधी

सोलापूर स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामांसाठी रस्ता खोदताना हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील जागेत दगडी भुयार आढळून आले आहे. हे भुयार ब्रिटिश कालावधीतील असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. आनंद कुंभार यांनी या भुयाराची पाहणी केली असून हे भुयार पाण्याचा निचरा होण्यासाठी 1870 ते 78 च्या दरम्यान बांधले असावे, असा अंदाज व्यक्त केला.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सध्या रंगभवन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत विविध विकासकामे केली जात आहेत. हरिभाई देवकरण प्रशालेसमोर भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. खोदकाम करताना हे भुयार आढळून आले आहे.

 हे भुयारच आहे की, ब्रिटिशकालीन गटार याबाबत विविध तर्क लढविले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या स्वच्छतागृहाला लागून हे भुयार आढळले आहे. त्याची सुरूवात याच ठिकाणाहून झाली असून, ते गावडे मंगल कार्यालयाच्या दिशेने गेले आहे.  या भुयाराची लांबी किती आहे, याचा अंदाज अद्याप आलेला नाही. तथापि, या भुयारातून चालत जाता येते इतकी जागा आहे. मात्र, या भुयारातून चालत जाणे धोकादायक असल्याने भुयार कुठपर्यंत गेले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न अद्याप झालेला नाही.