Sun, Apr 21, 2019 13:48होमपेज › Solapur › सुभेदार मेजर जालिंदर बाबर यांच्यावर आज अंत्यसंस्कार

सुभेदार मेजर जालिंदर बाबर यांच्यावर आज अंत्यसंस्कार

Published On: Jun 18 2018 10:45PM | Last Updated: Jun 18 2018 10:37PMसांगोला : तालुका प्रतिनिधी

आलेगाव (ता. सांगोला) गावचे सुपुत्र सुभेदार मेजर जालिंदर दादासाहेब बाबर यांच्या अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायतीकडून बाबरवाडी येथे अंत्यसंस्कारासाठी 5 बाय 7 चा चौथरा तयार केला असून, फुलांनी सजावट केली आहे. या ठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात मंगळवारी सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती सरपंच श्रीरंग बाबर व पोलिस पाटील दिलीप पाटील यांनी दिली आहे.

श्रीनगर येथील उधमपूर सेक्टरमधील पुँछमध्ये सीमेवर कर्तव्यावर असताना 101 मराठा लाईफ इन्फंट्री (टीए) बटालियनचे सुभेदार जालिंदर दादासाहेब बाबर (वय 50) यांचे रविवारी पहाटे 1 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचा पार्थिवदेह विमानाने दिल्लीत सायंकाळी साडेपाच वाजता आणला. तेथून विमानाने पुणे येथे रात्री साडेनऊ वाजता आणला जाणार आहे व पुणे येथून शववाहिकेतून त्यांचा पार्थिव मूळ गावी आलेगाव (ता. सांगोला) येथे मंगळवार दि. 19 रोजी सकाळी सहा पर्यंत पोहचणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव बाबरवाडी आलेगाव येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवून सकाळी आठ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

अंत्यसंस्कारासाठी अहमदनगर येथील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, जवान उपस्थित राहून त्यांना मानवंदना देतील अशी माहिती सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक मानद कॅप्टन मार्तंड दाभाडे व पोलिस पाटील दिलीप पाटील यांनी दिली आहे.