Mon, Jul 22, 2019 04:41होमपेज › Solapur › वृक्ष लागवडीसाठी चळवळ उभी करावी  : ना. देशमुख

वृक्ष लागवडीसाठी चळवळ उभी करावी  : ना. देशमुख

Published On: Jul 02 2018 1:50AM | Last Updated: Jul 01 2018 11:46PMसोलापूर : प्रतिनिधी 

पर्यावरणाचा समतोल रहावा, वनाच्छादित  क्षेत्रात वाढ होऊन हरित महाराष्ट्र घडावा, यासाठी यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात लोकांनी स्वयंप्रेरणेने व उत्स्फूर्तपणे सहभागी  व्हावे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

राज्य शासनाने यंदा 1 ते 31 जुलै 2018 या कालावधीत राज्यात 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला आहे. यानिमित्ताने आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथे वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास उपवनसंरक्षक संजय माळी, कृषी उपसंचालक रविंद्र माने, विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने, माळकवठेचे सरपंच शिवलिंग बगले यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ शालेय विद्यार्थी आणि वन व सामाजिक वनीकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

वृक्षलागवडीमध्ये लोकांचा सहभाग वाढावा यासाठी शासनाने शेतकर्‍यांच्या शेतात, बांधावर वृक्षलागवड करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत नवीन योजना आणली आहे. या योजनेतून शेतकर्‍याने झाडे लावून ती तीन वर्षे जगविल्यास प्रति वर्ष जिवंत रोपास पाचशे रुपये शेतकर्‍याला वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत देण्यात येणार आहेत. या योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहकारमंत्री देशमुख यांनी केले. गावा-गावात वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनमहोत्सव साजरे व्हावेत, वृक्ष लागवड कार्यक्रमात शेतकरी उत्पादन कंपन्यांनी अग्रेसर रहावे. सोलापूर जिल्ह्यात रक्तचंदन प्रजातीची झाडे येण्यास पोषक वातावरण असल्याने शेतकर्‍यांनी रक्तचंदनाची झाडे लावण्यास पुढे यावे, असे ते म्हणाले.

माहिती देताना माळी म्हणाले की, यंदा सोलापूर जिल्ह्यात 22.25 लाख रोपे लावण्यात येणार आहेत, यासाठी जिल्ह्यात 30 रोपवाटिकांमध्ये 30 लाख रोपे तयार आहेत. यावेळी विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने यांनी आभार मानले.