Sat, Aug 24, 2019 23:15होमपेज › Solapur › कुरेशी कुटुंबियांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा : देशमुख

कुरेशी कुटुंबियांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा : देशमुख

Published On: Feb 24 2018 9:23PM | Last Updated: Feb 24 2018 8:47PMमोहोळ ः प्रतिनिधी

पोलिसांच्या मदतीसाठी जाऊन आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या अबूतालीक कुरेशी कुटुंबियांना शासन स्तरावरुन मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण थेट भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मोहोळ शहरात दरोडेखोरांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवर केलेल्या खुनी हल्ल्यादरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी धावलेले मोहोळ शहरातील शूर नागरिक अबूतालीक कुरेशी यांनी स्वत:च्या प्राणाची आहुती देऊन एका दरोडेखोराला पकडून दिले होते. त्यामुळे मोहोळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या धाडसाचा व त्यागाचा सार्थ अभिमान आहे.  त्या धर्तीवर राज्याचे सहकारमंत्री सुभाष बापू देशमुख यांनी शनिवार, 24 फेब्रुवारी सायंकाळी साडेसहा वाजता मृत कुरेशी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी मोहोळच्या नूतन तहसीलदार मेघा ढोले, मोहोळचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नागनाथ भाऊ क्षीरसागर, नगरसेवक तथा भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत, आरपीआय युवक आघाडीचे पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हणुमंत कसबे, तालुकाध्यक्ष सतीश काळे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय कुर्डे, मृत कुरेशी यांचे चिरंजीव तौफिक कुरेशी, शोयब कुरेशी, हाजी इन्नुसभाई कुरेशी, मंजूर कुरेशी, भाजप सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष सागर लेंगरे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुभाष देशमुख म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेतून कुरेशी यांच्या वारसांना घर दिले जाणार असून त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे आश्‍वासन दिले. यावेळी मृत कुरेशी यांना शासन स्तरावरुन मदत मिळणार्‍या आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना यावेळी तहसीलदार मेघा ढोले यांना देशमुख यांनी दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्यासोबत मुंबई मंत्रालय येथे या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी येण्याचे देशमुख यांनी कुरेशी कुटुंबियांनी सुचविले आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्याकडून या घटनेची सविस्तर माहिती घेऊन मृत कुरेशी यांच्या शौर्याचे कौतुक केले.