Wed, Jul 24, 2019 12:05होमपेज › Solapur › सोलापूर मनपात पुन्हा दोन देशमुखांचा रडीचा डाव

सोलापूर मनपात पुन्हा दोन देशमुखांचा रडीचा डाव

Published On: Feb 17 2018 8:33PM | Last Updated: Feb 17 2018 8:33PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिका सभेत सत्ताधार्‍यांमधील गटबाजी कायम असल्याचा प्रत्यंतर शनिवारी पुन्हा आला. स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरुन पालकमंत्री व सहकारमंत्री या दोन गटांत एकमत झाले नाही. यामुळे संतप्त पालकमंत्री गटाच्या 35 नगसेवकांनी सभेवर बहिष्कार घालत यापुढे मनपा सभेत स्वतंत्र गट म्हणून बसण्याचे जाहीर केले. 

मनपाची फेब्रुवारी महिन्याची सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे यावेळी उपस्थित होते. उपमहापौर शशिकला बत्तुल अनुपस्थित होत्या. सभेची नियोजित वेळ अकराची होती, पण स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरुन  सत्ताधारी पालकमंत्री-सहकारमंत्री गटांत एकमत न झाल्याने सभेला सुमारे पाऊण तास उशीर झाला.  पालकमंत्री गटाचे अमर पुदाले, सुनील कामाठी आदी वगळता उर्वरित नगरसेवक सभेला अनुपस्थित होते. 

‘स्थायी’ सदस्यांची सभेत नियुक्ती

स्थायी समितीचे 8 सदस्य निवृत्त झाल्याने या रिक्त जागा भरण्याचा विषय सभापटलावर होता. यामध्ये भाजपच्या 4, शिवसेनेच्या 2, एमआयएम व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी 1 अशा एकूण 8 जागा रिक्त होत्या. या पदांवर नावांची शिफारस केलेला बंद लखोटा संबंधित पक्षाकडून महापौरांकडे देण्यात आला. हा लखोटा फोडून महापौरांनी त्यातील नावे जाहीर केली. यात भाजपने जुगनबाई आंबेवाले, सुभाष शेजवाल, राजश्री कणके, विनायक विटकर यांना संधी दिली. शिवसेनेने गणेश वानकर, भारतसिंग बडूरवाले यांना, एयआयएमने तौफिक शेख, तर राष्ट्रवादीने किसन जाधव यांची वर्णी लावली. दरम्यान,  सत्ताधारी गटाच्या नावांवरुन गोंधळ होऊ नये म्हणून सभागृहाची दारे बंद करण्यात आली होती. सभा सुरु असताना अचानक पत्रकार कक्षाजवळील कायमचे बंद दार बाहेरुन वाजविण्याचा आवाज येत असल्याने सभेची सर्व दारे बंद असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आले. यामुळे पालकमंत्री गटाच्या नगरसेवकांना सभादरम्यान सभागृहात येता आले नाही. 

सभा सुरु झाल्यावर प्रशासनाने रस्ता कामे तसेच 25 टक्के पाणीपट्टीवाढीविषयीचे तातडीचे  प्रस्ताव दाखल केले. त्यानंतर बसपचे गटनते आनंद चंदनशिवे यांनी 2 तातडीने प्रस्ताव मांडले. सभागृहनेते सुरेश पाटील यांना उपचारासाठी मनपाने अर्थसहाय्य द्यावे तसेच शिवरायांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करणार्‍या नगरच्या उपमहापौरांचा निषेध असे दोन विषय होते. 

तातडीच्या प्रस्तावावरुन खल

सभेत सभासदांना तातडीचा प्रस्ताव मांडता येतो का, अशी विचारणा विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केली. यावर नगरसचिवांनी  मांडता येतो असे उत्तर दिले. यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य यु.एन. बेरिया यांनी यासंदर्भातील तरतुदींविषयी खल केला. मागील सभेतही सुरेश पाटील यांच्यासंदर्भातील विषय मांडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो मांडण्यास अनुमती देण्यात आली नव्हती. तेव्हा हा विषय चालू सभेच्या अजेंड्यावर न आणता तातडीचा विषय आणून राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप कोठे यांनी केला.

स्वतंत्र गटाची कोळींकडून घोषणा

सभेनंतर पत्रकारांशी बोलताना स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांनी म्हटले की, ‘‘प्रदेश भाजपने स्थायी समितीसाठी शिफारस केलेल्या नावांमध्ये बदल करुन सहकारमंत्री गटाने दुसरीच नावे घुसडली आहेत. याचा आम्ही निषेध करतो. यापुढे मनपात पालकमंत्री गटाचे 35 नगरसेवक स्वतंत्र गट म्हणून कार्यरत राहणार आहे. सभेत प्रभारी सभागृहनेते म्हणून काम केलेल्या सहकारमंत्री गटाच्या नागेश वल्याळ यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, चारही जागा पालकमंत्री गटाला हव्या होत्या. निवृत्तांमध्ये 3 जागा पालकमंत्री, तर एक जागा सहकारमंत्री गटाची होती. असे असताना पालकमंत्री गटाने चारही जागांवर दावा केल्याने हा विषय प्रदेशकडे गेला. तेथून नावांची यादी न आल्याने शहराध्यक्षांनी दोन्ही गटाला प्रत्येकी दोन जागा देण्याचा निर्णय घेऊन तसे पत्र दिले. त्यानुसार ही नावे सभेत घोषित करण्यात आली.