Mon, Aug 19, 2019 09:05होमपेज › Solapur › महाविद्यालयात ‘दामिनी’कडून विद्यार्थ्यास मारहाण

महाविद्यालयात ‘दामिनी’कडून विद्यार्थ्यास मारहाण

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:18PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

दामिनी पथकाची वालचंद  महाविद्यालय परिसरात विद्यार्थी व विद्यार्थिनींना अरेरावी करत मारहाण केल्याविरोधात बुधवारी अनेक व विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी पोलिस आयुक्‍तालयात एसएफआय व युवा पँथरच्या नेतृत्वात धाव घेत दामिनी पथकाच्या चुकीच्या पद्धतीने करत असलेल्या कारवाईस आळा घालावा,  अशी मागणी करत सहायक पोलिस आयुक्‍त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्याकडे तक्रार केली.

मंगळवारी   वालचंद    महाविद्यालय  कॉलेज  परिसरातून जबरदस्तीने एका विद्यार्थाला उचलून घेऊन जाऊन अशोक चौक पोलिस चौकी येथे विनाकारण मारहाण केली असल्याचे विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्या मुलाची चूक इतकीच होती की, त्याने कॉलेज परिसरात फिरत असताना कॉलेज ओळखपत्र गळ्यात घातले नव्हते. मित्राकडे बॅग ठेवली होती. त्याच्या अंगावर गणवेश होता. तरीही दामिनी पथकाच्या दोन बिट मार्शल यांनी त्याचे काही न ऐकता उद्धट बोलतो, अशी अरेरावी करत पोलिस व्हॅनमध्ये बसवून घेऊन जाऊन प्रचंड मारहाण केली, अशी माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली. 
कॉलेज परिसरात कोणतीही कारवाई करायची झाल्यास प्राचार्यांची परवानगी लागते.  हे सर्व प्रकार प्राचार्य व कॉलेज प्रशासनास न कळवता घडले.  पुन्हा तसाच प्रकार  बुधवारी  सकाळी साडेदहाच्या

सुमारास  वालचंद महाविद्यालयात घडला. विद्यार्थ्यांची काही चूक नसताना अरेरावी करत महाविद्यालय परिसरात बसलेल्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मारहाण करत दमदाटी केली व अर्वाच्च भाषा करत विद्यार्थ्यांसोबत वादावादी केली. विद्यार्थ्यांनी  याबाबत  ताबडतोब प्राचार्य चंद्रकांत चव्हाण  यांच्याकडे धाव घेतली. प्राचार्यांनी दामिनी पथकास अशी कारवाई करण्याअगोदर तुम्ही विचारणा केली पाहिजे, असे दामिनी पथकास सुनावले. 

एका विद्यार्थ्याने माहिती देताना सांगितले की, महाविद्यालय कॉलेज कॅम्पसमध्ये मुले व मुली एकत्रित बसणेच गुन्हा झाले आहे. बुधवारी विद्यार्थ्यांनी या दामिनी पथकाच्या छळास कंटाळून विद्यार्थी संघटनेच्या मध्यस्थीने पोलिस आयुक्‍तालयात धाव घेतली.

यावेळी सहायक पोलिस आयुक्‍त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी विद्यार्थी शिष्टमंडळास सामोरे जात आयुक्‍तालय परिसरात जमलेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावर तत्काळ तोडगा काढून व चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालू असे आश्‍वासन देत यात सुधारणा करू, असेही सांगितले. यावेळी वालचंद हिराचंद  नेमचंद, दयानंद, संगमेश्‍वर महाविद्यायांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, जिल्हा सचिव मीरा कांबळे, अध्यक्ष मल्लेशम कारमपुरी, युवा पँथरचे अध्यक्ष अतिश बनसोडे, कार्याध्यक्ष रोहन बनसोडे,  वालचंदचे विद्यार्थी प्रतिनिधी संदेश कांबळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुहास कदम यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी बहुसंख्यने उपस्थित होते.

महाविद्यालयात दामिनी पथकाची दहशत
महाविद्यालय परिसरात नेहमीच दामिनी पथक येते आणि काहीही विचारपूस न करता कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांना दमदाटी करणे, मारहाण  करणे असे प्रकार  अनेक दिवसांपासून चालू आहेत. महाविद्यालय परिसरात दामिनी पथकाने  दहशतच निर्माण केली आहे. दामिनी पथक हे बाहेरील टवाळखोरांवर कारवाई करण्याऐवजी आतील विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचे विद्यार्थी सांगत होते.