Wed, Jun 26, 2019 11:40होमपेज › Solapur › कचरा संकलनाचे काम ठप्प 

कचरा संकलनाचे काम ठप्प 

Published On: Jan 02 2018 1:17AM | Last Updated: Jan 01 2018 11:18PM

बुकमार्क करा
सोलापूर :  प्रतिनिधी

किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळण्याच्या मागणीसाठी घंटागाड्यांवरील कंत्राटी कामगार शनिवारपासून अचानक संपावर गेल्याने शहरातील कचरा संकलनाचे काम ठप्प पडले आहे. दरम्यान, मनपाच्या कायम कर्मचार्‍यांकरवी कचरा उचलण्याच्या पर्यायी यंत्रणेला एका कर्मचारी संघटनेने विरोध केल्याने याकामी चक्‍क पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी मनपा प्रशासनाने केली आहे. 

तीन वर्षांपूर्वी मनपाने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचार्‍यांनी नियुक्‍ती केली होती. या कर्मचार्‍यांना किमान वेतनापेक्षाही कमी वेतन देण्यात येत होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार कायमव्यतिरिक्‍त सर्व कर्मचार्‍यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्याची मागणी मनपातील कामगार संघटनांकडून करण्यात आली होती. ही मागणी आयुक्‍तांनी तत्त्वत: मान्य केली होती. हा विषय स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता; मात्र हा विषय समितीकडे पाठवू नये, असे एका कर्मचारी संघटनेचे म्हणणे होते. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्याचा शब्द आयुक्‍तांनी दिला होता; मात्र किमान वेतनाप्रमाणे वेतन तातडीने आदा करण्यात यावे, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे होते. आयुक्‍तांनी हे म्हणणे मान्य न केल्याने शनिवारपासून घंटागाडी कर्मचारी अचानक संपावर गेले. यामुळे कचरा व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडले. 

सोमवारी मनपा प्रशासनाने मनपाच्या कायम कर्मचार्‍यांच्या साहाय्याने कचरा संकलनाची पर्यायी व्यवस्था उभी केली. जेसीबी, डंपरच्या मदतीने हे काम करण्यात येत असताना एका कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी डंपरच्या चाकातील हवा सोडून तसेच मनपाच्या कर्मचार्‍यांना धमकावून कामात व्यत्यय आणला. यामुळे कचरा संकलनाचे काम ठप्प झाले.

आयुक्त रजेवर असल्याने अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी या घटनेची दखल घेत पोलिसांना पत्र देऊन कचरा संकलन करण्याकामी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली. या विषयावरुन मनपा प्रशासन व कर्मचारी संघटनेमधील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.