होमपेज › Solapur › पंढरपूर : मराठा, धनगर आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांची उचलबांगडी सुरू

पंढरपूर : मराठा, धनगर आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांची उचलबांगडी सुरू

Published On: Jul 21 2018 11:37PM | Last Updated: Jul 21 2018 11:36PMपंढरपूर : प्रतिनिधी 

आषाढी एकादशी महापूजेला मुख्यमंत्र्यांनी येऊ नये म्हणून आंदोलन सुरू केलेल्या मराठा आणि धनगर समाजातील कार्यकर्त्यांशी संवाद होत नसल्याने हतबल झालेल्या पोलीस प्रशासनाने दक्षता म्हणून दोन्ही समाजातील आघाडीच्या कार्यकर्त्यांची उचलबांगडी सुरू केली आहे. मराठा क्रांती मोर्चा च्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पोलिसांनी 149 नुसार नोटिसा बजावलेल्या कार्यकर्त्याना  गावोगावी जाऊन ताब्यात घेण्याचे सत्र सुरू केले आहे. मराठा आणि धनगर समाजातील सुमारे 15 कार्यकर्त्याना ताब्यात घेऊन तालुका पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले असल्याचे समजते. यातील काही कार्यकर्त्याना सांगोला पोलीस ठाण्यात नेऊन स्थानबद्ध केल्याचेही समजते.

पोलिसांच्या रडारवर असलेल्या इतर कार्यकर्त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळं अनेक कार्यकर्ते पसार झालेले आहेत. मात्र त्यानंतर ही तालुक्यातील आंदोलनाचा भडका कमी होताना दिसत नाही. सायंकाळी 5 वाजता सांगोला रोडवर एका बसच्या काचा फोडल्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कोरटी येथे एका st बसचे दगडफेक करून मोठे नुकसान केले आहे. या st बसवर मराठा क्रांती मोर्चाचे पत्रक चिकटवले आहे. 

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महापूजा दौरा अनिश्चित असून शनिवारी रात्री 10 वाजेपर्यंत तरी दौऱ्याचा कार्यक्रम आलेला नव्हता. मंदिर समितीने त्यांच्या हस्ते महापूजा करण्याचे नियोजन केले आहे तर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचे नियोजित कार्यक्रम ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. विशेष पोलीस बळ मागवले असून पंधरपूरात 8 हजारांवर पोलीस बंदोबस्त मागवला आहे. तसेच आज अखेरच्या एकूण परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवला असून या अहवालात मुख्यमंत्र्यांना महापूजेला येण्याविषयी नकारात्मक शेरा कळवला असल्याचे समजते. 

एकंदरीत मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा होतो की नाही हे गुलदस्त्यातच असताना आंदोलकांची धरपकड मात्र पोलिसांनी सुरू केली आहे असे दिसते.