Fri, Apr 26, 2019 04:13होमपेज › Solapur › अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडा

अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडा

Published On: Sep 10 2018 11:18PM | Last Updated: Sep 10 2018 10:55PMसोलापूर : प्रतिनिधी

देशात अलीकडील काळात कट्टरतावादी लोकांकडून जातीय, धार्मिक दंगली पसरवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकांनी सजग राहून हा प्रयत्न हाणून पाडायला हवा, असे आवाहन भिक्खू पय्यानंद यांनी केले.

अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण भिक्खू पय्यानंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी डॉ. बाळासाहेब मागाडे (पत्रकारिता), सचिन खरात (चित्रकार), गौतम गायकवाड (दिग्दर्शन), विलास थोरात (नाटककार), डॉ. शरद गायकवाड (साहित्यिक), डॉ. श्रध्दा सनमडीकर (अभिनय), डी.एस. नरसिंगे (प्रबुद्ध नायक), चित्रसेन भवार (गीतकार) आदींना  राज्यस्तरीय प्रबुध्द पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

याप्रसंगी ‘यारी’ व ‘दोष माझाच’ या लघुपटाच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी केले. याप्रसंगी नाटककार संजय सायरे, भीम आर्मीचे अशोक कांबळे, एम. सलीम खान, पी. बी. कांबळे, रघुनाथ गायकवाड, व्ही. बी. अजनीकर, फारुख शेख, मोहन भालेराव, रणजित सूर्यवंशी, अंबादास शिंदे, श्रीशैल रणधिरे, विश्‍वास ताकपिरे, मतीन बागवान, दिव्या गुमटे आदींसह प्रबुद्ध नाट्य परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

डी. एस. नरसिंगे म्हणाले की, मातंग समाज बुद्धमय करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. प्राध्यापक मंडळींनी फुले, शाहू व आंबेडकर यांच्याविषयी नोट्स काढून शिकविण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन प्रत्यक्षात कृतीत उतरावेत.

डॉ. शरद गायकवाड म्हणाले की, हिंदू धर्मव्यवस्थेमुळे पोतराजाचे जीवन जगत होतो, परंतु फकिरा कादंबरीमुळे पोतराजाचा प्राध्यापक झालो. समाजातील 38 पोतराजांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे परिवर्तन केले. धम्माचे चक्र हे क्रांतीचे चक्र असून त्यानुसार कार्यरत राहूया. यावेळी सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार, प्रबुद्ध गायकवाड, यु. एफ. जानराव, भारत काळे यांचा सत्कार करण्यात आला.