Tue, Apr 23, 2019 10:04होमपेज › Solapur › पुतळ्यांकडे दुर्लक्षामुळे सोलापुरातील शांततेला लागू शकते गालबोट

पुतळ्यांकडे दुर्लक्षामुळे सोलापुरातील शांततेला लागू शकते गालबोट

Published On: Mar 14 2018 12:48AM | Last Updated: Mar 13 2018 9:32PMसोलापूर : इरफान शेख

महाराष्ट्रासह देशभरातील महामानवांनी देशासाठी आपले प्राण अर्पण करुन इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला व भारतीय जनतेला मुक्त केले. त्यामध्ये काही समाजसेवकांनीदेखील कर्मठ रुढीपरंपरेतून भारतीय समाजाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. अशा महामानवांचे पुतळे भारताच्या प्रत्येक शहरात पाहावयास मिळतात. परंतु हल्लीच्या घटनांमुळे किंवा गलिच्छ राजकारणामुळे या पुतळ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

अगदी काही दिवसांअगोदर त्रिपुरामध्ये सत्ता परिवर्तन होताच रशियन राज्याक्रांतीमध्ये महत्त्वाची  भूमिका  बजावणारे  ब्लादिमीर लेनिन यांचा पुतळा पाडण्यात आला.त्याविरोधात काही समाजकंटकांनी कोलकातामधील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करत त्यांचा चष्मा तोडला तर याचे लोण महाराष्ट्रात पसरत औरंगाबाद शहरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास अज्ञात समाजकंटकांनी डांबर फेकून विटंबना करण्याचा प्रयत्न केला. त्याची पुनरावृत्ती इतर शहरांतदेखील होऊ शकते. याचा आढावा घेत सोलापुरातील पुतळे किती सुरक्षित आहेत व किती असुरक्षित आहेत हे पाहणे गरजेचे आहे.

सोलापुरात राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबसाहेब आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, लोकमान्य टिळक, अहिल्याबाई होळकर, चार हुतात्मे, द्वारकानाथ कोटणीस, बसवेश्‍वर महाराज,  इंदिरा गांधी,  अण्णाभाऊ साठे, सावरकर, तुकाराम कन्ना, शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांचे पुतळे भर चौकांत आहेत. कधी कधी या पुतळ्यांकडे सोलापूरकरांचे लक्ष जाते. यामधील काही पुतळ्यांना शासनाकडून  किंवा समाजसेवकांकडून जयंती व पुण्यतिथीला पुष्पहार अर्पण करण्यात येतो. बाकी वेळेस याकडे कुणीच लक्ष देत नाही. परंतु शहराच्या शांततेला अबाधित करण्यासाठी सहज मार्ग असल्याचे चित्र दिसत आहे.

यशवंतराव चव्हाण व राणा प्रतापसिंह
  सात रस्ता परिसरात राणा प्रतापसिंह व यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे गेल्या अनेक वर्षांपासून उभे आहेत.धावती वाहतूक असल्यामुळे कोणत्याच नागरिकाचे या पुतळ्यांकडे लक्ष जात नाही. राणा प्रतापसिंह यांना मानणारा मोठा समाजवर्ग सोलापुरात वास्तव्यास आहे. या पुतळ्याच्या सुरक्षिततेला धोका झाल्यास विशिष्ट समाज संतप्त होण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी
  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा रेल्वे स्टेशनच्या समोर आहे. 1960 साली याचे अनावरण झाल्याची नोंद कोनशिलेत कोरण्यात आली आहे. फक्त 2 ऑक्टोबर  जयंती किंवा 30 जानेवारी  पुण्यतिथीच्या वेळेस प्रशासन व स्वघोषित समाजसेवक येथे जाऊन  पुष्पहार अर्पण करतात. राष्ट्रपिता यांच्या पुतळ्याची विटंबना होऊ नये यासाठी खास अशी सुरक्षाव्यवस्था  नाही किंवा सीसीटीव्हीची सुध्दा व्यवस्था नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शहराच्या  मधोमध  असलेल्या पार्क चौकात आहे. या चौकाला आंबेडकर चौक म्हणूनही ओळखण्यात येते. मुख्य चौक असल्यामुळे येथे पायी जाणार्‍यांची व वाहनांची वर्दळ मोठी आहे. पुतळ्याशेजारी बसण्याची व्यवस्था असल्याने नेहमी याठिकाणी वृध्दांची बैठक दिसते. बाजूलाच पोलिस पॉईंट असल्याने पोलिसांचा बंदोबस्त नेहमी असतो. पुतळ्यासमोर सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

चार हुतात्मा व अहिल्याबाई होळकर
  इंग्रजांच्या काळात झालेल्या अत्याचाराविरोधात जगन्नाथ शिंदे, मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा व कुर्बान हुसेन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.स्वातंत्र्यासाठी  फासावर लटकून यांनी स्वत:चे प्राण अर्पण केले होते. या चारही हुतात्म्यांचे पुतळे पार्क चौकामध्ये आहेत. हुतात्मा दिनादिवशी प्रशासनास या चार पुतळ्यांची आठवण येते तसेच त्याशेजारीच पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आहे. याकडेदेखील विशिष्टवेळीच लक्ष देताना दिसते.

शिवाजी महाराज व संभाजी महाराज
  बसस्थानकासमोरच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे व जुना चौत्रा पुणे नाका येथे संभाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सीसीटीव्हीची सुरक्षा असणे गरजेचे आहे. संभाजी महाराजांच्या पुतळ्यालादेखील सुरक्षारक्षकाची गरज आहे. कारण या पुतळ्यांची सुरक्षा करणे, त्यांची विटंबना होऊ न देणे हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. 

राणी लक्ष्मीबाई व वसंतराव नाईक
  विजापूर रोडवरील कंबर तलावाशेजारी राणी लक्ष्मीबाई व वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुतळ्यांना कोणीसुध्दा डोकावूनदेखील पाहिले नाही. एकही सुरक्षारक्षक येथे उपलब्ध नाही. स्वच्छतेकडेदेखील दुर्लक्षच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमान्य टिळक
  टिळक चौकात लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्यात आला आहे. फक्त जयंती व पुण्यतिथीला या पुतळ्याची  स्वच्छता  केली  जाते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लढणार्‍या महामानवांची फक्त जयंती व पुण्यतिथीला आठवण केली जाते. त्यानंतर त्याचा विसर  पडतो.

बसवेश्‍वर महाराज 
  कोंतम चौकात बसवेश्‍वर महाराज यांचा पुतळा आहे. बसवेश्‍वर जयंतीला मात्र मोठ्या वाजतगाजत मिरवणूक मार्गाने यांना अभिवादन केले जाते. परंतु इतर वेळेस याच्या स्वच्छतेकडे व पुतळ्याच्या सुरक्षिततेकडे मात्र दुर्लक्षच असल्याचे चित्र पाहावयास मिळते.

शंकरराव चव्हाण व वसंतदादा पाटील
  डफरीन  चौकात महाराष्ट्राचे   तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा  पुतळा उभा करण्यात आला आहे. सिव्हिल चौकात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. या पुतळ्यांकडे विशेष लक्ष देताना दिसून येत नाही. यांची विटंबना झाल्यावरच प्रशासनास जाग येणार आहे.अनेक दिवसांपासून हे पुतळे धूळखात आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर
  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा अशोक चौकातील उद्यानात उभा आहे. सावरकर उद्यानात अभ्यासिका असल्याने स्पर्धा परीक्षा किंवा विविध परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. परंतु सावरकरांच्या पुतळ्यासाठी सुरक्षारक्षक असण्याचीदेखील तेवढीच गरज आहे. सार्वजनिक उद्यान असल्याने या पुतळ्याची सुरक्षा महत्त्वाची आहे. 

तुकाराम कन्ना
  कोंतम चौकापुढील चौक म्हणजे कन्ना चौक होय. या  चौकामध्ये  तुकाराम कन्ना यांचा पुतळा आहे.सोलापुरातील एका मोठ्या समाजवर्गासाठी तुकाराम कन्ना आदरणीय व पूजनीय आहेत. भर चौकात यांचा पुतळा आहे. या पुतळ्याकडेदेखील दुर्लक्षच केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 1988 साली हा पुतळा उभारण्यात आला आहे.

इंदिरा गांधी 
  सोलापूर महानगरपालिकेत इंदिरा गांधी यांचा पुतळा उभा आहे, तर विजापूर रोडरील पोस्ट ऑफिससमोरदेखील इंदिरा गांधी यांचा पुतळा उभा आहे. पुतळा उभे करण्यापुरतेच हे राजकीय नेते राजकारण करताना आढळून येतात. त्यानंतर काही वर्षांनी याकडे मात्र दुर्लक्षच होताना दिसून येते.

सुभाषचंद्र बोस
  मुस्लिम पाच्छा पेठ येथील सार्वजनिक उद्यानात सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. काही वर्षांअगोदर येथील पुतळ्याची विटंबनादेखील करण्यात आली होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची सुरक्षा ‘राम भरोसे’ आहे.

दै. ‘पुढारी’ने केली पाहणी
देशभरात सध्या पुतळ्यांच्या विटंबनाचे मोठ्या प्रमाणात प्रकार घडत आहेत. या घटनेचे लोण औरंगाबादपर्यंतही पोहोचले आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर विशेषत: पोलिस खात्यानेही  ही बाब गंभीर घेतली आहे. परंतु या पुतळ्यांची देखभालीची व्यवस्था नेमकी कशी आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न दै. ‘पुढारी’च्या प्रस्तूत प्रतिनिधीने केला असता शहरातील महत्त्वाच्या महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी आवश्यक ती सुरक्षाव्यवस्थाच नसल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही, सुरक्षा कर्मचारी यांच्याही नेमणुका झाल्या नसल्याचे या पाहणीतून दिसून येत आहे.