Wed, Mar 27, 2019 00:23होमपेज › Solapur › महाधिवक्‍ता कुंभकोणी यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा

महाधिवक्‍ता कुंभकोणी यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा

Published On: Jun 22 2018 2:04AM | Last Updated: Jun 21 2018 11:03PMसोलापूर : प्रतिनिधी

राज्याचे महाधिवक्‍ता अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी यांना राज्य शासनाने राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा अध्यादेश गुरुवारी काढण्यात आला आहे.  राज्याचे महाधिवक्‍ता या नात्याने त्यांना प्रदान करण्यात आलेले अधिकार व सोपविण्यात आलेल्या जबाबदार्‍या प्रभावीपणे पार पाडता याव्यात, या हेतूने महाधिवक्‍ता  कुंभकोणी यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा प्रदान करण्याची  बाब  राज्य शासनाच्या  विचाराधीन  होती. त्यानुसार महाधिवक्‍ता पदावर अ‍ॅड. कुंभकोणी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार महाधिवक्‍ता  कुंभकोणी यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. या दर्जामुळे त्यांना मानधन, निवासी दूरध्वनीवरील खर्च, कार्यालयीन कामकाजासाठी वाहन सुविधा, सर्वोच्च न्यायालय-उच्च न्यायालय व सर्व न्यायाधिकरणात न्यायप्रविष्ठ प्रकरणी शासनाची बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी तसेच  शासकीय प्रयोजनासाठी बिझनेस क्‍लासने विमान प्रवास, राज्यमंत्री दर्जाचे निवासस्थान, शासकीय समारंभाच्यावेळी केंद्रीय अग्रक्रम सूचीच्या अधिन राहून राज्यमंत्र्याच्या नंतरचे स्थान राहील, अशा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. याबाबतचा अध्यादेश गुरुवारी अवर सचिव संजीव केळुसकर यांच्या सहीने काढण्यात आला आहे.