Wed, May 22, 2019 22:20होमपेज › Solapur › ‘मेक इन सोलापूर’ ब्रँड तयार करू : सहकारमंत्री देशमुख

‘मेक इन सोलापूर’ ब्रँड तयार करू : सहकारमंत्री देशमुख

Published On: May 15 2018 10:52PM | Last Updated: May 15 2018 10:25PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर शहर तसेच जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, आम सोलापूरकर सधन झाला पाहिजे, या हेतूने सोलापूर सोशल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. मूळ सोलापूरकर असलेल्या पुणेकरांनी जन्मभूमीच्या प्रगतीसाठी पुढे यावे. सर्वांनी एकत्र येवून काम केल्यास मेक इन इंडियाच्या धर्तीवर सोलापूरच्या विकासाचा नवा ब्रँड तयार करू, असा विश्‍वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला़.
सोलापूर सोशल फाऊंडेशनच्यावतीने पुण्यात स्थायिक असलेल्या विविध उद्योजक, व्यावसायिक, प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते, शासकीय सेवा आदी क्षेत्रातील मान्यवरांचा पुण्यात मेळावा पुणे येथील डॉ. शिरनामे सभागृहात आयोजित केला होता. यावेळी ना. देशमुख बोलत होते. 

प्रारंभी सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक चंद्रशेखर पाटील, चित्रपट निर्मात्या मृणालिनी भोसले, व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, माजी शिक्षण संचालक एन.बी. पासलकर व विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

ना. देशमुख म्हणाले, सोलापूर विकासाच्या दिशेने झेप घेत आहे. अशा परिस्थितीत सोलापूर शहराचा देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर एक ब्रँड असावा, अशी आपली संकल्पना आहे. यातूनच सोलापूर सोशल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून सोलापूरसाठी जे -जे करता येईल, ते-ते करण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून गावातील छोट्यातील छोट्या व्यक्तीचा रोजी-रोटीचा प्रश्‍न सुटू शकेल. जलसंधारण, शिक्षण, उद्योग, पर्यटन या क्षेत्रात अनेक संधी आहेत. या संधीचा उपयोग करून सोलापूरचे ब्रँडिंग कसे करता येईल, या दृष्टीने या फाऊंडेशनचा प्रयत्न राहणार असून यासाठी पुण्यात स्थायिक असलेल्या सोलापूरकरांनी आपला खारीचा वाटा उचलावा, अशी अपेक्षा आहे. येणार्‍या काळात पुण्यासह ठिकठिकाणी सोलापूर महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

यावेळी विनायक गरड, विक्रम पोतदार, भानुदास उकंरडे, अमोल जगताप, प्रशांत कुलकर्णी, विकास शिंदे, दयानंद कोकरे, शैलेश कोतमिरे, नयना गुंडे, नितीन भोसले, गणेश शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाबाबत मते मांडली. मेळाव्याचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले.

कृषी, तीर्थक्षेत्र पर्यटन केंद्रबिंदू
सोलापूरची ओळख कृषी आणि तीर्थक्षेत्रांमुळे झाली आहे. त्यामुळे सोलापूर फाऊंडेशनचे विधायक कामे करण्याबरोबरच कृषी आणि तीर्थक्षेत्र पर्यटन वाढीसाठी येणार्‍या काळात काम करावे, यासाठी जिल्हानिहाय, विभागनिहाय  भूमिपुत्रांच्या समित्या स्थापन कराव्यात आणि त्या माध्यमातून सोलापूरचे ब्रँडिंग करावे, अशा प्रकारचा सूर मेळाव्यातील उपस्थितांनी धरला. त्यावर ना.  देशमुख यांनी तशा प्रकारचा कृती आराखडा तयार करण्याचे जाहीर केले.