Wed, Jun 26, 2019 11:29होमपेज › Solapur › होळी आंदोलनाचा फुसका बार; फक्‍त निषेध

होळी आंदोलनाचा फुसका बार; फक्‍त निषेध

Published On: Jan 25 2018 10:28PM | Last Updated: Jan 25 2018 10:28PMसोलापूर ः प्रतिनिधी

एसटी कर्मचार्‍यांचा होळी आंदोलनाचा बार फुसका निघाला.होळी आंदोलनाऐवजी निषेधाच्या फक्‍त घोषणा देत शासनविरोधातील आंदोलन चार ते पाच मिनिटांत गुंडाळले.

एसटी कर्मचारी गुरुवारी सकाळी पगारवाढीच्या आलेल्या अहवालाविरोधात अहवालाची प्रत जाळून होळी आंदोलन करणार होते; परंतु बुधवारी सायंकाळी राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालयातून कारवाईचे आदेश निघाले. त्या परिपत्रकाचा धसका घेत अनेक एसटी कर्मचार्‍यांनी होळी आंदोलनास पाठ दाखविली, तर हजर असलेल्या एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व सदस्यांनी होळी आंदोलन रद्द करून सोलापूर येथील विभागीय कार्यालयासमोर निषेधाच्या तीन ते चार घोषणा देत आंदोलनाचा गाशा गुंडाळला; परंतु 9 फेब्रुवारी रोजी होणार्‍या आक्रोश मोर्चात आंदोलनाची तीव्रता समजेल. अशी मुस्कटदाबी करून किंवा दंडेलशाही करून चालणार नाही, असेही एका एसटी कामगार संघटनेच्या सदस्याने सांगितले.

17 ऑक्टोबर रोजी एसटी कामगार संघटनेने ऐन दिवाळीत सातव्या वेतन आयोगानुसार वेतन आदा केले जावे, या मागणीसाठी बेमुदत चक्‍काजाम संप पुकारला होता. तब्बल चार दिवस हा संप चालला होता. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने आदेश देत हा संप मागे घेण्याचा आदेश दिला होता व राज्य सरकारला समिती स्थापन करुन पगारवाढीचा अहवाल सादर करा, असा आदेश बजावला होता. परंतु पगारवाढीसंदर्भात स्थापन केलेल्या या समितीने अपेक्षित पगारवाढ केली नाही.

या समितीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या आपल्या शिफारसीमध्ये 2.57 च्या सूत्राऐवजी 2.37 चे सूत्र सादर केले आहे. वार्षिक वेतनवाढीचा दर 3 टक्क्यांऐवजी 2 टक्के केला आहे.घरभाडे भत्त्यामध्ये 10 टक्क्यांऐवजी 7 टक्के, 30 टक्क्यांऐवजी 21 टक्के अशी घट केली आहे. सुधारित वेतनवाढीची अंमलबजावणी 1/4/2016 ऐवजी 1/1/2018 पासून चार वर्षांसाठी करणार आहेत.एस.टी. कामगारांच्या कृती समितीने हा अहवाल फेटाळून लावला आहे. एस.टी. कामगार पुन्हा आंदोलन व संपाचे हत्यार उपसणार असल्याचा निर्णय 19 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला  आहे.

गुरुवारी सकाळी सोलापूर येथील  विभागीय कार्यालयात एस.टी. कर्मचारी तुरळक संख्येत संघटनेच्या कार्यालयासमोर जमा झाले. पोलिसांनीदेखील आपला बंदोबस्त ठेवला होता. मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात नमूद केलेल्या अर्जानुसार आदेश बजावण्यात आला होता की, एस.टी. महामंडळाच्या कार्यालयात कोणत्याही प्रकारच्या सभेस व अथवा अहवालाची होळी करता येणार नाही. आंदोलन करणार्‍यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे व त्याबाबत सहभागी झालेल्या एस.टी. कर्मचार्‍यांचा अहवाल तयार करावा. उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची होळी करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान करणे आहे. प्रवासी वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे परिणाम होणार नाही. असे कडक आदेश आल्याने एस.टी. कर्मचार्‍यांनी त्याचा धसका घेत आंदोलनाला पाठ दाखविली.

कर्मचार्‍यांची मुस्कटदाबी 

एसटी कर्मचार्‍यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न शासनातर्फे करण्यात येत असल्याची माहिती एसटी कर्मचारी सांगत होते. अपेक्षित पगारवाढ न मिळाल्याने कामगार संघटनेच्या वतीने गुरुवारी सकाळी अहवालाची होळी  करण्यात येणार होती; परंतु कारवाईचा धसका घेत होळी आंदोलनाऐवजी फक्‍त निषेधाच्या दोन-चार घोषणा देत आंदोलन गुंडाळण्यात आले; परंतु पुढील आंदोलनात तीव्रता जाणवेल, अशीही माहिती देण्यात आली.