Fri, Jul 19, 2019 01:12होमपेज › Solapur › द. सोलापूरच्या विकासासाठी काँग्रेसजनांचा एकीचा एल्गार

द. सोलापूरच्या विकासासाठी काँग्रेसजनांचा एकीचा एल्गार

Published On: Feb 05 2018 11:00PM | Last Updated: Feb 05 2018 11:00PMहोटगी : प्रतिनिधी

 दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे बसवेश्‍वर बेदाणा आणि नेटींग मशीनच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील सर्व काँग्रेसचे नेते एकत्र येऊन यापुढे एकत्र राहण्याचा एल्गार केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, आ. सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पुढाकारातून मकरसंक्रांतीला तीळगुळाच्या  माध्यमातून तालुक्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणले होते. त्यानंतर प्रथमच दक्षिण सोलापूर तालुक्यातील या कार्यक्रमानिमित्त काँग्रेसचे नेतेगण एकत्र येऊन आपल्या चुका मान्य करत यापुढे सर्वांनी एकत्र राहण्याचा संकल्प केला. 

आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते निंबर्गी येथील बसवेश्‍वर बेदाणा आणि नेटींग मशीनचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अक्‍कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार शिवशरण पाटील, स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे,  बाळासाहेब शेळके, दक्षिण सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरूसिध्द म्हेत्रे, बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे नेते गोपाळराव कोरे, प्रवीण देशपांडे, भीमाशंकर जमादार, सिकंदरताज पटेल, संतोष पवार, सुभाष पाटोळे, हरिश पाटील आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमांतर्गत आमदार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या की, तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठी ही एकी अशीच ठेवावी. आपली एकी टिकली तरच शेतकरी टिकणार आहेत.तालुक्यातील सारी मंडळी एकसंध राहिले तर भाजपाच काय, कोणताच पक्ष टिकू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण सोलापूर तालुक्याचा विधानसभेत आवाज उठताना दिसून येत नाही. शिंदे यांनी जो न्याय या तालुक्याला दिला, तो न्याय पुन्हा मिळवून देण्याचे धाडस करणार असल्याचे सांगितले. आता जनतेला जनतेची चूक कळलेली आहे. बजेटमध्ये सचमूच का झूठ अन् झुठमूठ का सच, असाच हा बजेट असल्याचं सांगितले.

 याप्रसंगी आमदार सिध्दाराम म्हेत्रे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान म्हणजे हिटलरसारखे आहेत. त्याचा आता अनुभव जनतेला येऊ लागला आहे. या तालुक्याची आण, बाण, शान ठेवायची असेल तर काँग्रेसजनांनी एकत्र राहण्याची गरज असल्याचे सांगितले. मोदी गुरूजींनी जनतेला वेड्यात काढले आहे. आता जनता शहाणी झाली असून ते फार काळ जनतेला फसवू शकत नसल्याचे सांगितले.
आ. माने यांनी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसमय करा, आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्या मागे खंबीरपणे उभारणार असल्याचे सांगितले. दक्षिण तालुका हा भिणारा तालुका नाही. हा तालुका आपण भयमुक्‍त करू, असे त्यांनी सांगितले. जनतेच्या हितासाठी कोणतेही आंदोलन घ्यावे, त्यास आपला पाठिंबा राहणार असल्याचे माने यांनी सांगितले.

माजी आमदार शिवशरण पाटील यांनी सरकार कोणाचेही असो, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटले पाहिजेत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण आपले रक्‍तही सांडण्यास तयार असल्याचे सांगितले. आपला मालक कुणी नाही, आपण स्वत: सक्षम असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापुरे यांनी केले. सूत्रसंचालन राजकुमार साळुंखे यांनी केले, तर सिध्दाराम बिराजदार यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

माजी आमदार शिवशरण पाटील चिडले
आ. प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील काँग्रेसजनांच्या एकीच्या गाडीचे स्टेअरिंग आ. सिध्दाराम म्हेत्रे यांच्या हातात आहे. गाडी कुठे पंक्चर झालीच तर शिवशरण अण्णांच्या हातात स्टेफनी आहेच. त्यांचा स्टेफनी म्हणून उल्लेख केल्याने पाटील यांनी शिंदेंचे भाषण संपताच, त्यांनी आपण स्टेफनी वगैरे कुणी नाही ते तुमचे तुम्ही बघा. स्टेफनी तुमच्या माणसाच्या हातात देण्याचे सांगत, तुमची गाडी कशी न्यायची ते अक्‍कलकोटपर्यंत न्या. बिराजदार माझे भावकी असल्याने मी याठिकाणी शेतकरी या नात्याने आलो असल्याचे स्पष्ट केले.