Fri, Jul 19, 2019 23:03होमपेज › Solapur › अतिरिक्त दुधावर उपाय शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना देणार दूध भुकटी

अतिरिक्त दुधावर उपाय शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना देणार दूध भुकटी

Published On: Aug 23 2018 11:33PM | Last Updated: Aug 23 2018 11:33PMकरकंब: भीमा व्यवहारे

राज्यात अतिरिक्त होणाऱ्या दुधावर उपाययोजना करण्यासाठी शालेय पोषण आहारात दूध भुकटीचा समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार राज्यात पहिले तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेतून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना तीन महिन्यासाठी २०० ग्रॅमची दूध (भुकटीची) पावडरची प्रत्येकी तीन पाकिटे एकूण ६०० ग्रॅम दूध पावडर देण्यात येणार आहे. 

शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नऊ जणांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे सचिव म्हणून प्राथमिक शिक्षण संचालक काम पाहतील. तसेच ते या योजनेचे राज्य समन्वय आधिकारी म्हणून हि काम पाहणार असून या योजनेच्या अांमलबजावणीच्या अनुशंगाने आवश्यक ती कार्यवाही ते करणार आहेत.

सदर दूध (भुकटीची) पावडरची पाकिटे विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी दिली जाणार असून ते पाकीट विद्यार्थ्यांनी घरी नेल्यानंतर पालकांनी आपल्या पाल्यांना त्या दूध भुकटीपासून घरी दूध तयार करून देणे अपेक्षित आहे. शाळांमधून ही पाकिटे शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत एकाच दिवशी वाटप केली जाणार आहेत.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातील पोषण आहारामध्ये दूध भुकटीची पाकिटे केवळ प्रायोगिक तत्त्वावर म्हणून तीन महिने दिली जाणार आहेत. राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी दूध भुकटी ही महाराष्ट्रातच तयार झालेली असावी.  या योजनेसाठी लागणारा निधी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत राज्य हिस्सापोटी अर्थसंकल्पात असलेल्या लेखाशिर्षामधून खर्च केला जाणार आहे.

शाळेत होणार 'दूध भुकटी वाटप दिवस' 

 शालेय पोषण आहार योजनेत  शाळांना साप्ताहिक वेळापत्रक देण्यात आले आहे, त्यामध्ये आता 'दूध भुकटी वाटप दिवस' निश्‍चित करायचा असून शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याला तीन पाकिटे द्यायची आहेत. त्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या पालकांना दूध भुकटीपासून दूध कसे तयार करावे याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.