Wed, Apr 24, 2019 15:29होमपेज › Solapur › पुढच्या महिन्यापासून रेशन दुकानात मिळणार तूरडाळ 

पुढच्या महिन्यापासून रेशन दुकानात मिळणार तूरडाळ 

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 9:09PM

बुकमार्क करा

सोलापूर : महेश पांढरे    

 शेतकर्‍यांच्या मालाला हमी  भाव मिळावा, यासाठी राज्यशासनाने सुरू केलेल्या बाजार हस्तक्षेत योजनेंतर्गत खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करून ती तूर आता स्वस्त धान्य दुकानांवर विक्री करण्यात येणार असून त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना शासनाने विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानांवर आता ग्राहकांना प्रती किलो 55 रुपये दराने तुरीची डाळ उपलब्ध होणार आहे.

राज्यशासनाने राज्यातील शेतकर्‍यांच्या शेती मालाला हमी भाव मिळावा, यासाठी सर्वच जिल्ह्यात तूर खरेदीसाठी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्या माध्यमातून शासनाने मोठ्या प्रमाणावर तूर खरेदी केली आहे. त्याचा योग्य विनियोग व्हावा आणि बाजारपेठेतील दलाली कमी व्हावी, यासाठी या तुरीची भरडाई करून त्यातून तयार झालेली तूरडाळ रेशन दुकानांवर विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील सर्वच शिधापत्रिका धारकांना ही तूर डाळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ यांच्यावतीने प्रत्येक जिल्ह्याला तूर डाळ पुरविण्यात येणार आहे. मुंबई व ठाण्यासाठी नवी मुंबई गोदामांतून ही डाळ देण्यात येणार आहे, तर पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूर या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात हे वितरण करण्यात येणार आहे. तसेच कोणकोणत्या गोदामात किती डाळ शिल्लक आहे, याची माहिती मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रक, संचालक नागरी पुरवठा यांना तर इतर जिल्ह्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी व महाराष्ट्र पणन राज्य सहकारी संघ यांना वेळच्या वेळी देण्यात येणार आहे. तसेच वितरणासाठी सोईचे ठरावे यासाठी प्रती किलोचे पाकीट बनवून त्याचे वितरण करण्यात येणार आहे. डाळीचे भाव नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे सामान्य माणसाला प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या निर्णयामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे.