Tue, Aug 20, 2019 05:18होमपेज › Solapur › अमीर खान यांना मानपत्र देण्याचा मनपा सभेत प्रस्ताव 

अमीर खान यांना मानपत्र देण्याचा मनपा सभेत प्रस्ताव 

Published On: May 25 2018 1:21AM | Last Updated: May 25 2018 1:21AMसोलापूर : प्रतिनिधी

सध्या महाराष्ट्रात पाणी चळवळीसाठी प्रसिद्ध झालेल्या अभिनेता अमीर खान यांना पाणी चळवळीबाबत सोलापूर महापालिकेतर्फे मानपत्र देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अभिनेता अमीर खान यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सोलापूरसह अनेक दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण कार्य करण्याचे काम हाती घेतले आहे. या चळवळीनिमित्त गतवर्षी उत्तर सोलापूर तालुक्यातील काही  गावांनाही भेट देऊन आमीर खान यांनी श्रमदान केले होते. त्यांच्या या कार्यास प्रतिसाद म्हणून ग्रामीणबरोबरच शहरी भागातील नागरिकही मोठ्या संख्येने राज्यभरात सर्वत्र पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी होत आहेत.

आतापर्यंत या चळवळीच्या ‘सत्यमेव जयते व वॉटर कप’ या उपक्रमांतून दहा हजार कोटी लिटर पाण्याचे संधारण झाले आहे. या कार्याची दखल घेत  भाजपचे नगरसेवक रवी कय्यावाले, विनायक विटकर व नगरसेविका अंबिका पाटील यांनी शुक्रवारी होणार्‍या महापालिका सभेत अमीर खान यांना महापालिकेतर्फे मानपत्र देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पाणी बचाव ही काळाची गरज असून याबाबत चळवळ उभी करून पाणी बचतीचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचे काम अमीर खान यांनी केले आहे. या चळवळीत तरुणांना आकर्षिक करण्याचे विधायक कार्य करणार्‍या अमीर खान यांना मनपातर्फे मानपत्र देऊन यथोचित सत्कार करावा, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

हातमाग विणकरांना नोंदणी करण्याचे आवाहन 
सोलापूर : राज्यातील चौथ्या हातमाग गणनेचे काम कार्वी डाटा मॅनेजमेंट सर्व्हिस लि. हैदराबाद या संस्थेमार्फत करण्यात आले आहे. मात्र हातमाग गणनेमध्ये यापूर्वी पात्र असलेला हातमाग  विणकर अनावधानाने समाविष्ट झालेला नसेल किंवा यावेळेस नव्याने विणकर आहे, मात्र त्याचे नाव हातमाग गणनेच्या यादीत नसेल अशा सर्व हातमाग विणकरांना प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, सोलापूर जिल्हा महसूल विभाग कर्मचार्‍यांची सहकारी पतसंस्था, सोलापूर येथे संपर्क साधून आपले नाव समाविष्ट करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.