Sat, Jul 20, 2019 02:14होमपेज › Solapur › वीर धरण भागविणार तहान 

वीर धरण भागविणार तहान 

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 19 2018 10:44PMसोलापूर ः प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील वीर धरण पूर्ण क्षमेतेने भरले असल्याने वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग सोडला आहे. तो नीरा नरसिंगपूर येथील संगमाद्वारे भीमा नदीत आणि भीमेतून थेट सोलापूरच्या औज बंधार्‍यात पोहोचणार आहे. त्यामुळे या पुढचे तीन महिने सातारकरांच्या धरणातील पाण्याने सोलापूरकरांची तहान भागणार आहे.

पुण्यात चांगला पाऊस झाला की पुणे-सोलापूर सीमेवरील उजनी धरण भीमेच्या पाण्याने भरते आणि सोलापूरकरांची पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटतो हे आजपर्यंतचे गणित आहे. मात्र, दर तीन महिन्याला सोलापूरकरांना भीमेतून पाणी सोडण्यासाठी मागणी करावे लागते, उजनीत पाणी कमी असल्यास अक्षरशः भांडून पाणी मिळवावे लागते. मात्र, यंदा पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने भीमा नदीबरोबर भीमेचीच उपनदी असलेल्या नीरा नदीही दुथडी भरून वाहत आहे. नीरेचा उगम पुणे जिल्ह्यात जरी असला तरी ती सातार्‍यातील शिरवळ तालुक्यातून वाहते आणि पुढे परत सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील नीरा नरसिंगपूर येथे भीमेला मिळते. त्यापुढे भीमा ही थेट पंढरपूरमार्गे सोलापुरात येत असल्याने नीरेतून सोडलेले पाणी भीमामार्गे सोलापुरात पोहोचत आहे. अर्थात नीरा नरसिंगपूर-पंढरपूर-सोलापूर अशा मोठ्या प्रवाहात अनेक छोटे बंधारे आहेत. मात्र गेल्या महिनाभर सातत्याने सुरु असलेल्या रीपरीप पावसाने वीर धरण भरून तब्बल 25 हजार क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे सर्व बंधारे चटकन भरून गेले आणि  पाणी सोलापूरच्या औज बंधार्‍यापर्यंत पोचले आहे.

सध्या सोलापूरच्या औज बंधार्‍यामध्ये केवळ एक मीटर इतका पाणी साठा होता, जो सोलापूरला केवळ दहा-बारा दिवस पुरला असता. त्यामुळे उजनीतून नदीमार्गे पाणी सोडण्याची तयारी सुरु केलेली असतानाच वीर धरणातील सोडलेले पाणी सोलापूरात पोचले आहे. पुण्यातील आणि वीर धरणाच्या लाभ क्षेत्रातील पाऊस असाच सुरु राहिला तर याच पाण्याने सोलापूरातील औज बंधारा पूर्ण भरेल आणि पुढच्या तीन महिन्यापर्यंत शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. शिवाय उजनीचे पाणी नदीमार्गे सोडण्याच्या मागणीची गरजच या खेपेला तरी राहणार नाही.