Fri, Apr 26, 2019 18:06होमपेज › Solapur › दोन मंत्र्यांच्या गटबाजीमुळे सोलापूरचा विकास खुंटला : चंदनशिवे

'दोन मंत्र्यांच्या गटबाजीमुळे सोलापूरचा विकास खुंटला'

Published On: Feb 23 2018 10:47PM | Last Updated: Feb 23 2018 10:39PM सोलापूर ः  प्रतिनिधी

पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील गटबाजीमुळे मनपा कारभारावर परिणाम होऊन शहराचा विकास खुंटला. आता जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बसपचे मनपातील गटनेते आनंद चंदनशिवे यांनी शुक्रवारी दिला.

गेल्या वर्षभरात नगरसेवकांना निधी न मिळाल्यामुळे शहरात एकही विकासाचे काम झाले नसल्याबद्दल बसपतर्फे महापालिका प्रवेशद्वारासमोर सत्ताधार्‍यांविरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बसपचे प्रदेश महासचिव संजीव सदाफुले, बसपच्या नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगुंडे, स्वाती आवळे, माकपच्या नगरसेविका कामिनी आडम, विजय बमगुंडे, गौतम चंदनशिवे, श्रीमंत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

चंदनशिवे पुढे म्हणाले,  मनपाकडून भांडवली निधीची पूर्तता झाली नाही. अंदाजपत्रकातील बर्‍याच तरतुदी रद्द करण्यात आल्या. शासन निधीतून काही प्रभागांतच कामे सुरु आहेत. गटबाजीमुळे मनपा सभा वेळेवर सुरु होत नाही. सोयीनुसार सभेचे कामकाज सुरु असून विकासाचे सत्ताधार्‍यांना काहीच घेणे-देणे नसल्याने जनता वार्‍यावर आहे. 

यावेळी सदाफुले म्हणाले, देश, राज्य तसेच सोलापुरात भाजपची सत्ता आहे. सोलापुरात दोन मंत्री तसेच एक खासदार असतानाही मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. ही बाब दुर्दैवी आहे. याप्रसंगी आडम यांनी भाजपच्या मनपातील कारभाराविषयी टीका केली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लोकरे, शहराध्यक्ष देवा उघडे, कामगार नेते अशोक जानराव, भीमा इंगळे, अविनाश भडकुंबे, प्रवीण जवळे, अभिजित कापुरे, अमित माने, बंटी माने, सिद्धार्थ सुर्वे, नितीन बंदपट्टे, अ‍ॅड. अवधूत तीर्थकर, बापू थोरात, शेख, सोनवणे सहभागी झाले होते.