Sat, Jul 11, 2020 23:46होमपेज › Solapur › प्रलंबित मागण्यांसाठी आज ग्रामसेवक बैठक

प्रलंबित मागण्यांसाठी आज ग्रामसेवक बैठक

Published On: Dec 21 2017 1:50AM | Last Updated: Dec 20 2017 9:57PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या दालनात ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकार्‍यांची बैठक गुुरुवारी आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियान व घरकुल या दोन महत्त्वाच्या योजना ग्रामसेवकांनी अत्यंत यशस्वीपणे काम केल्याने त्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी डॉ. भारुड यांच्याकडून बोनस मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गळगुंडे यांच्यासह या बैठकीला युनियचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहात आहेत. बारा वर्षांनंतरची मिळणारी पदोन्नती मिळणे, 24 वर्षांनंतरची पदोन्नती मिळणे, कंत्राटी सेवा पदोन्नतीसाठी पात्र ठरविण्यात यावे आदी प्रमुख मागण्या यावेळी ग्रामसेवक वर्गाकडून करण्यात येत आहेत. याशिवाय आस्थापनाविषयच्या मागण्या आहेत. 

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारुड यांच्या आदेशानुसार ग्रामसेवकांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव हागणदारीमुक्त करणे, घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित करुन बांधकाम पूर्ण करणे या दोन्ही कामांत ग्रामसेवकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. डॉ. भारुड यांनी दिलेल्या सूचनेनुसार उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवकांनी कामकाजाव्यतिरिक्त अतिरिक्त वेळ देऊन या योजनांना गती दिली. राज्यभरात सोलापूर जिल्हा या दोन्ही योजनेत अव्वल ठरला आहे. 

मुळात ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांची संख्या तोकडी आहे. अनेक पदे रिक्त असल्याने एका ग्रामसेवकांवर दोन दोन गावांचा गाडा रेटण्याचा प्रसंग आला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमध्ये होणार्‍या बैठकांना तोंड देत योजनांच्या अंमलबजावणीसाठी रात्रीचाही दिवस करण्याची वेळ अनेक ग्रामसेवकांवर आली आहे. त्यामुळेच गत वर्षभरात चांगले काम दिसून येत आहे. 
कंत्राटी सेवा ग्राह्य धरुन यापूर्वी ग्रामसेवकांना पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र यासाठी आता अडचणी निर्माण होत आहेत. पदोन्नतीची गत काही वर्षात रखडलेली प्रक्रिया डॉ. भारुड यांच्याकडून पूर्ण होईल, अशीच अपेक्षा ग्रामसेवकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

गत सहा महिन्यांपूर्वी ग्रामसेवक संघटनेच्यावतीने राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र ग्रामसेवक युनियनच्यावतीने सामंजस्याची भूमिका घेत या आंदोलनाला केवळ पाठिंबा दर्शवून ग्रामसेवकांनी प्रशासकीय अधिकार्‍यांच्या हाकेला प्रतिसाद देत कामकाज सुरु केले होता. त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होऊ शकली आहेत. 

ग्रामसेवकांना प्रत्येक गावात विचित्र राजकीय परिस्थितीला सामोरे जावे लागते. तक्रार नाही असा एकही ग्रामसेवक शोधून सापडणार नाही, अशी परिस्थिती आहे. दोन गटांतील वादात ग्रामसेवकांना घेऊन सातत्याने तक्रारी करण्यात येतात. यात सरंपचांना बाजूला ठेवून प्रशासनाकडून अनेकदा दबावापोटी ग्रामसेवकांवर कारवाई होते. गैरप्रकार असल्यास संबंधित ग्रामसेवकांवर जरुर कायदेशीर कारवाई करण्यात यावी मात्र राजकीय हेतूने विनाकारण ग्रामसेवकांना बदनाम करणार्‍या लोकांच्या तक्रारींवर प्रशासनाने कोठेतरी मुरड घालण्याची गरज निर्माण झाली असल्याची भावना ग्रामसेवकांची आहे.