Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Solapur › माणदेशी घोंगडीला आता ‘डिजिटल’ साज

माणदेशी घोंगडीला आता ‘डिजिटल’ साज

Published On: Jul 11 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 12:07AMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

ग्रामीण जीवनशैलीचे एक अविभाज्य अंग असलेली घोंगडी व जेन आधुनिक युगात अडगळीत पडतील की काय, अशी स्थिती निर्माण झाली असताना याला आता पुनर्वैभव प्राप्त होणार आहे. माणदेशी भागात तयार होणार्‍या घोंगडी व जेनाला आता ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

उमरड (ता. करमाळा) व कळम (ता. बारामती) येथील इंजिनिअर युवकांनी एकत्र येत ‘घोंगडी डॉट कॉम’ संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅप विकसित केले असून त्याद्वारे उत्पादकांना थेट राज्याच्या कानाकोपर्‍यात माल विकता येणार आहे. आज बाजारात ब्लँकेटस्, स्वेटर्स, चादरी सहज उपलब्ध होतात. मात्र घोंगडी व जेन सहजासहजी मिळत नाही. परिणामी घोंगडी कला ही शेवटच्या घटका मोजत आहे. घोंगडीच्या पारंपरिक वापराची लुप्तता, हा निव्वळ बदलाचा भाग असला तरी याच घोंगडीला बाजारपेठेच्या मुख्य प्रवाहात आणणेही तितकेच महत्त्वाचे होते. ही गरज ओळखून उमरड येथील तुषार पाखरे व कळममधील निरज बोराटे या इंजिनिअर मित्रांनी या ग्रामीण कलेला आधुनिकतेची जोड देत ‘घोंगडी डॉट कॉम’  संकेतस्थळ आकारास आले. 

माणदेशी वारसा जपण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह विशेषतः माणदेशी भागात घोंगडी व जेन तयार करणारी अनेक कुटुंबे आहेत. मेंढराच्या शुद्ध लोकरीपासून बनविण्यात येणार्‍या घोंगडीला मागील तीस वर्षांपूर्वी सोन्याचे दिवस आले होते. मात्र घोंगडीपेक्षा चादरीचे दर तुलनेत कमी असल्याने तसेच आधुनिक जीवनशैलीमुळे घोंगडीचा वापर कमी होऊ लागला. तिची लोकप्रियता कमी होऊन ही कला अडगळीत पडली. पारंपरिक खड्डा मागावर घोंगडी बनवणारे अस्सल ग्रामीण धनगर कारागीर आज बोटांवर मोजण्या इतपत उरले आहेत. सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील घोंगडी उत्पादक अखेरची घटका मोजत आहेत. या डिजिटल मार्केटिंगमुळे त्यांना उर्जितावस्था मिळाली आहे.

घोंगडी व जेनाचे महत्त्व अबाधित
घोंगडी व जेनाचा झोपण्यासाठी वापर केल्याने पाठदुखी, वात व कंबरदुखीपासून मुक्त राहता येते. शरीराला नैसर्गिक आराम मिळतो. रक्ताभिसरण व उच्च रक्तदाब नियंत्रणास मदत होते. विशेष म्हणजे तीनही ऋतूतशरीराच्या तापमानावर नियंत्रण मिळवता येते. योगासने, ध्यानधारणेसोबतच घोंगडीवर आराम करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ डॉक्टर देतात. ग्रामीण भागात पारायण, भंडारा, जागरण गोंधळ, सत्यनारायण तसेच विविध धार्मिक विधीवेळी घोंगडीला विशेष महत्त्व असते. अध्यात्मिक साधना, ध्यान-धारणेसाठी ऋषींनी आणि संत-महात्म्यांनी पुराणकाळापासून घोंगडीचे महत्त्व सांगितले आहे.