Mon, Mar 25, 2019 17:25होमपेज › Solapur › मनपा पदाधिकार्‍यांना ६ कोटींचा ऐच्छिक निधी

मनपा पदाधिकार्‍यांना ६ कोटींचा ऐच्छिक निधी

Published On: Jun 15 2018 10:35PM | Last Updated: Jun 15 2018 10:30PMसोलापूर : प्रतिनिधी

सत्ताधारी भाजपने महापालिका अर्थसंकल्पात केलेल्या ऐच्छिक निधी तरतुदीच्या विरोधात काँग्रेस व बसपा हे विरोधी पक्ष न्यायालयात जाणार आहेत. सध्या स्थायी सभापतीचा वाद सर्वोच्च न्यायालयात असून, आता ऐच्छिक निधीचा विषयदेखील उच्च न्यायालयात धडकणार आहे.

महापालिकेत काँग्रेस सत्तेवर असताना पदाधिकार्‍यांच्या ऐच्छिक निधीविरोधात भाजपने शासन, न्यायालयाकडे धाव घेतली होती, आता सत्तेवर आल्यावर भाजपच्या पदाधिकार्‍यांना याचा विसर पडला आहे. त्यांनी बजेटमध्ये ऐच्छिक निधीची तरतूद केल्याने त्याविरोधात विरोधी पक्ष न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती मनपातील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे व बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. मंगळवारी महापालिकेचे सन 2018-19 चे बजेट झाले. या बजेटमध्ये महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आदी पदाधिकार्‍यांच्या नावे एकूण सहा कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यास काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे व बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी आक्षेप घेतला आहे. शुक्रवारी याबाबत पत्रकारांशी बोलताना नरोटे म्हणाले, काँग्रेस सत्तेवर असताना भाजपचे विश्‍वनाथ बेंद्रे यांनी पदाधिकार्‍यांच्या नावे निधी ठेवणे बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली होती. 

तद्नंतर याच पक्षाचे प्रा. अशोक निंबर्गी यांनी असाच आक्षेप घेत शासनाकडून स्थगिती मिळविली होती. नंतर ही मंडळी न्यायालयातही गेली. सत्तेवर आल्यावर भाजपच्या मंडळींना पदाधिकारी ऐच्छिक निधीबद्दलच्या त्यांच्या धोरणाचा विसर पडला आहे. याची आठवण करुन देण्यासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहोत.