Wed, May 22, 2019 22:40होमपेज › Solapur › सीईओ साहेब तर जेवणाचीही सोय करा...

सीईओ साहेब तर जेवणाचीही सोय करा...

Published On: Jul 16 2018 1:20AM | Last Updated: Jul 15 2018 10:27PMटिपणी : संतोष आचलारे

मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेतील मिनी मंत्री असलेले पदाधिकारी गत काही महिन्यांपासून बेफिकीर वागत असून, ग्रामीण भागातील जनतेशी त्यांची नाळ आहे, की नाही अशी शंका निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेत घेण्यात येणार्‍या स्थायी सभा व विषय समितीच्या सभा या केवळ सदस्यांसाठी चहा व नाष्टापुरतेच उरल्या असल्याचा सूर उमटत आहे. विषय समितीच्या सदस्यांना व सभापतींना आता मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जेवणाची सोय करावी, असे कोणी म्हंटले तरी ते फारसे वावगे ठरणारे नाही. 

ग्रामीण भागाचा विकास करण्याची क्षमता जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम, महिला व बालकल्याण समिती, कृषी व पशुसंवर्धन समिती, शिक्षण व आरोग्य, जलव्यवस्थापन व स्थायी या समित्यांमध्ये आहे. या विषय समित्यांच्या सभेत नेमके काय निर्णय घेण्यात येतात, ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी काय चर्चा झाली, कोणत्या योजना सुरु करण्यात आल्या, कोणत्या योजना पुढे सरकत नाहीत, याबाबत सभेत चर्चाच होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. विषय समितीच्या सभा झाल्यानंतर जनतेच्या माहितीसाठी काही तरी निर्णय सांगण्याचे धाडस कोणत्याही सभापतीत सध्या दिसून येत नाही. त्यामुळे सभेत चहा व नाष्टा यापलीकडे काही होते का नाही, असा प्रश्‍न सातत्याने निर्माण होत आहे. 

मिनी मंत्रालयाची  शाळा म्हणजे  भावी आमदारकीची  शाळा म्हंटले जाते.त्यामुळे जनतेच्या हिताचे प्रश्‍न मांडणे व ते मार्गी लावण्यासाठी समितीच्या सदस्यांमध्ये स्पर्धा असण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी अशी स्पर्धा सदस्यांत दिसून येत होती. सध्या सभापतीसह विषय समितीचे सदस्य अत्यंत निरुत्साही व बळजबरीने कोणीतरी जिल्हा परिषदेत पाठविल्यासारखे वागत आहेत. ते नेमके काय काम करीत आहेत, जनतेच्या हितासाठी त्यांच्याकडून होतेय तरी काय, याची कोणतीच माहिती त्यांच्याकडून जनतेला किंवा पत्रकारांना देण्यात येत नसल्याने विद्यमान जि.प. पदाधिकारी व सदस्यांविरोधात रोष पसरत आहे. काही मोजके सदस्य विषय समितीत आक्रमक होतात, पण त्यांच्याकडून सोयीची भूमिका घेण्यात येत असल्याने, त्यांच्यावरही टीका होत आहे. अनेक सदस्य गत दीड वर्षापासून मौन व्रतच पाळलेले दिसत आहेत. विरोधी पक्षनेता बळीराम काका साठे हे देखील सत्ताधारी पक्षात असल्याचे दिसून येत आहे. माळशिरस तालुक्यातील केवळ एक सदस्य बोलण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्यालाही त्यांच्याच लोकांची साथ मिळत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.