सोलापूर : प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गावोगावी झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर अनेक गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली. मात्र ग्रामसेवक युनियनने ग्रामसभेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याने यादिवशी ग्रामसेवकांनी ग्रामसभेत दांडी मारल्याचे दिसून आले.
अनेक गावात सरपंचाच्या अध्यक्षतेखाली केवळ नावाला ग्रामसभा घेण्यात आली. याचे इतिवृत्त आता कशा पद्धतीने होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने ग्रामसभेवर बहिष्कार न टाकण्याचे आदेश दिले होते, तरीही संघटनेच्या नावाखाली एकत्रित येऊन ग्रामसेवकांकडून शासकीय कामकाजातच अडथळा आणला जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ग्रामीण भागातील प्रत्येक गावात मोठ्या उत्साहाने ग्रामसभा घेऊन गावाच्या विकासाकरीता दिशा देण्यात येते. मात्र ग्रामसेवक युनियनच्या भाऊसाहेबांनी आपली सुट्टी कामात फुकट वाया जाऊ नये, यासाठी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा न घेता या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता, अशी टीका होत आहे. या प्रकारामुळे ग्रामसेवकांविरोधात सर्वत्र रोष पसरत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात येणार्या ग्रामसभेत अनेकदा वादाचे विषय होतात. पोलिस बंदोबस्त नसतो. ग्रामसेवकांनाही मारहाण करण्याचा प्रसंग येतो, त्यामुळे ही ग्रामसभा 26 जानेवारी ऐवजी याच महिन्यात कोणत्याही दिवशी आयोजित केली तर ग्रामसेवक त्या सभेस उपस्थित राहतील, असा कांगावा ग्रामसेवक युनियनने घेतली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गावात सर्व नागरिक उपस्थित राहतात. रोजीरोटीसाठी बाहेरगावी असलेले सर्व तरुण मंडळी यादिवशी गावात येतात. यादिवशी आयोजित केलेल्या ग्रामसभेला ही तरुण मंडळी उपस्थित राहून गावाच्या हितासाठी काही तरी भूमिका घेतात. त्यामुळे गावाच्या विकासाला योगदान मिळत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. यंदाच्या वर्षीही असाच सहभाग ग्रामसभेत दिसून आला आहे. असे असतानाही केवळ शासकीय सुट्टीचा आनंद भोगण्यासाठी भाऊसाहेब अंग काढून घेण्यात येत असल्याची चर्चा उमटत आहे. राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे व 2 ऑक्टोबर यादिवशी ग्रामसभा घेण्याचे संकेत आहेत. मात्र याबाबत कायद्यात कोठेही नोंद नसल्याची भूमिका भाऊसाहेबांनी घेत ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा विचित्र निर्णय घेतला आहे.
ग्रामसभेसारख्या महत्त्वपूर्ण शासकीय कामकाजात लोकसेवक म्हणून कार्यरत असणारे ग्रामसेवकच जर अडथळा आणत असतील तर त्यांच्यावरही शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असाच सूर गावागावातून उमटत असल्याचे दिसून येते.