Mon, Jun 17, 2019 14:34होमपेज › Solapur › जि.प. पदाधिकार्‍यांचे अधिकार्‍यांवरील नियंत्रण सुटले

जि.प. पदाधिकार्‍यांचे अधिकार्‍यांवरील नियंत्रण सुटले

Published On: May 07 2018 11:57PM | Last Updated: May 07 2018 11:45PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांचे अधिकार्‍यांवरील नियंत्रण सुटल्याने अधिकारी मनमानी पध्दतीने वागत असल्याचे दिसून येत आहेत. या प्रकारामुळे जि.प. सदस्यांत मात्र नाराजी पसरली असून दाद मागायची तरी कोणाकडे, अशी अवस्था बहुतेक जि.प. सदस्यांची झाली आहे. 

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारावरुन अनेकदा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीत रणकंदन झाले. मात्र यानंतरही शिक्षण विभागाचा कारभार सुधारत नसल्याचे दिसून येत आहे. विशेषतः माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांच्याविरुध्द अनेक तक्रारी असतानाही त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

सदस्यांत तीव्र नाराजी

जि.प. समाजकल्याण विभागाचे प्रभारी समाजकल्याण अधिकारी विजय लोंढे यांच्या कारभाराबाबतही सदस्यांत तीव्र नाराजी आहे. मागील महिन्यात समाजकल्याण विभागाने आयोजित केलेल्या समता पंधरवडा कार्यक्रमाचे नियोजन समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मागासर्गीयांसाठी असलेल्या योजना ग्रामीण भागात पोचवून या योजनांबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने या माध्यमातून केला.

जनजागृतीचा प्रयत्न

मात्र या उपक्रमास केवळ जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभापती शिला शिवशरण व अन्य काही जि.प. सदस्यांनीच कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. लोंढे हे समाजकल्याण अधिकारी म्हणून काम करण्यास इच्छुक नसतानाही त्यांना या पदावर बळीजबरीने कोणाच्या इच्छेखातर ठेवण्यात येते, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अन्य कोणत्याही अधिकार्‍यांकडे या विभागाचा पदभार सोपवून रेंगाळलेली कामे सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

आमसभा रद्दची नामुष्की

दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड हे आमसभा असतानाही रजेवर गेले. त्यांच्या रजेमुळे आमसभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली गेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून घेण्यात येणार्‍या दरमहा परीक्षेत मरोड पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होतात. मात्र प्रत्यक्षात पंचायत समितीच्या कारभारात अंदाधुंदी कारभार दिसून येतो. वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी  लाभार्थ्यांना अजूनही या पंचायत समितीने अनुदान न दिल्याने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांत तीव्र संताप पसरला गेला आहे. 
मस्तवालपणा वाढत चालला

अधिकार्‍यांची संख्या कमी आहे. प्रत्येक अधिकार्‍यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई केली तर कामकाज करायचे तरी कसे, असा प्रश्‍न जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांना पडला आहे. मात्र या प्रकारामुळे कामचुकार व बेफिकीर अधिकार्‍यांचा मस्तवालपणा वाढतच जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जि.प. अध्यक्ष शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना कटू निर्णय घ्यावाच लागणार आहे.

वर्ष ते दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतरही अधिकारी मिळविण्यात पदाधिकार्‍यांना यश आले नाही.