Tue, Jul 16, 2019 09:57होमपेज › Solapur › जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीवरुन सदस्यांची नाराजी 

जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीवरुन सदस्यांची नाराजी 

Published On: Jun 14 2018 10:37PM | Last Updated: Jun 14 2018 9:59PMसोलापूर : प्रतिनिधी 

जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांचा विकास निधी अखर्चित राहिल्याने तो निधी शासनाला परत करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढावली आहे. अधिकार्‍यांच्या कामकाजावर शंका उपस्थित करीत अनेक योजनांपासून सर्वसामान्य लोकांना वंचित ठेवल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे. समाजकल्याण व कृषी विभाग निधी खर्च करण्यात पिछाडीवर आहे.

जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी अर्थ समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षण आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी समाजकल्याण विभागाला जि.प. सेसमधून 6 कोटी 34 लाख रुपयांचा निधी दलित वस्ती सुधार आणि मागासवर्गीय लोकांच्या विकासासाठी देण्यात आला होता. त्यापैकी केवळ 2 कोटी 61 लाख रुपये खर्च करण्यात समाजकल्याण समितीला यश आले आहे. सेसमधील जवळपास 3 कोटी 61 लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. जिल्हा नियोजन मंडळातून 16-17 साठी 63 कोटी 10 लाख, तर 17-18 साठी 58 कोटी 31 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. 

एकूण 121 कोटी रुपयांचा निधी समाजकल्याण विभागाला मिळाला होता. त्यापैकी आजपर्यंत 46 कोटी 16 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात समाजकल्याण समितीला यश आले. यापैकी जवळपास 75 कोटी 15 लाख रुपयांचा निधी शिल्लक राहिला आहे. यामुळे अनेक गावच्या दलित वस्त्या विकासापासून वंचित राहिल्या आहेत. कृषी विभागाला सौरदिव्यांसाठी देण्यात आलेल्या निधीपैकी 3 लाख रुपयांचा निधी शासनाला परत पाठविण्याची वेळ आली आहे. इतर काही विभागांचा निधी काहीअंशी झाला असला तरी अनेक विभागांचा निधी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झालेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जि.प. सेस योजनेसाठी शासनाने आता पहिल्यांदा खरेदी करण्याची पध्दत अवलंबिल्याने अनेक योजनांना लाभार्थ्यांनी नकारात्मकता दर्शविल्याने तो निधी खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे अनेक विभागांचा निधी अखर्चित राहिला असल्याचे विभागप्रमुखांनी सांगितले आहे. या बैठकीस श्रीमंत थोरात, भारत शिंदे, समता गावडे, रोहिणी मोरे, अंजनीताई पाटील आदी उपस्थित होते.