Mon, Dec 17, 2018 15:34होमपेज › Solapur › जि.प.चा मनमानी कारभार; ठेकेदारांना पोसण्याची प्रथा 

जि.प.चा मनमानी कारभार; ठेकेदारांना पोसण्याची प्रथा 

Published On: Dec 01 2017 11:17PM | Last Updated: Dec 01 2017 10:45PM

बुकमार्क करा

सोलापूर : संतोष आचलारे

जिल्हा परिषदेचा कारभार गत काही महिन्यांपासून मनमानी पध्दतीने चालला असून ठेकेदारांना पोसण्याची प्रथा रुढ झाल्याने आश्‍चर्य निर्माण होत आहे. विशिष्ट ठेकेदारांनाच सातत्याने मुदतवाढ देऊन काम देण्यात जिल्हा परिषद मेहरबान होत असल्याने याचा अर्थ वेगळ्या अर्थाने काढला जात आहे. अशातच जि.प. वित्त विभागाचे जिल्हा परिषदेत वजन वाढल्याने जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत संशय निर्माण होत आहे. अशी चर्चा सुरू आहे. 

जिल्हा परिषद आरोग्य विभागास वाहनचालक पुरविण्याचा ठेका संपला असतानाही त्याच ठेकेदारास पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. एका वाहनचालकास बारा हजार रुपये पगार ठेकेदाराकडून देणे अपेक्षित असताना वाहनचालकांना केवळ सात ते आठ हजार रुपयांचा पगार देण्यात येत असल्याची ओरड होत आहे. असे असतानाही याचा ठेका पुन्हा त्याच ठेकेदारास देण्यात आला आहे. अशी विचारणा होत आहे.

सर्वशिक्षा अभियानात गत अनेक वर्षांपासून सयाजीराव नामक व्यक्‍ती ठाण मांडून बसल्याने त्याच्या मनमानीनेच ठेकेदारांची निवड होत असल्याची चर्चा आहे. बदलीसाठी ही व्यक्‍ती पात्र असतानाही बदली पुन्हा कशी रद्द करता येते, याची संपूर्ण माहिती या रावांना चांगलीच माहिती असल्याने या व्यक्‍तीची मालकशाही वर्षानुवर्षे सुरू असल्याचे दिसून येत आहे. कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणणारे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना हे प्रकरण कसे माहिती नाही, याचेही आश्‍चर्य निर्माण होत आहे. नेहरू वसतिगृहात स्वच्छतारक्षक व सुरक्षारक्षक पुरविणे, शेळगी येथील मुलींच्या वसतिगृहाची स्वच्छतेची कामे, जि.प. मुख्यालय, यशवंतनगर येथील पदाधिकार्‍यांची वसाहत व पंचायत समिती कार्यालयात सुरक्षारक्षक पुरविण्याची कामे सातत्याने त्याच त्या ठेकेदारांना मिळत आहेत. त्यामुळे जि. प. कारभाराबाबत संभ्रम निर्माण होत आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात शीतयुद्ध लावून कोण आपली पोळी भाजून घेत आहे. अर्थ विभागाचे वजन अलीकडे वाढले कसे. वित्त विभाग सांगेल त्याचप्रमाणे  कारभार सुरू झाल्याने जिल्हा परिषदेच्या कारभारावर टीका होत आहे.